सामाजिक उपक्रम

तब्बल ४२ वर्षांनी रंगला मैत्रीचा अविस्मरणीय स्नेहसोहळा अनेकांच्या डोळ्यांत दाटले आनंदाश्रू

इंग्लिश स्कूल वेळापूरच्या १९८३-८४ दहावी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा भावनिक मेळावा

 

तब्बल ४२ वर्षांनी रंगला मैत्रीचा अविस्मरणीय स्नेहसोहळा

इंग्लिश स्कूल वेळापूरच्या १९८३-८४ दहावी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा भावनिक मेळावा
अनेकांच्या डोळ्यांत दाटले आनंदाश्रू
वेळापूर प्रतिनिधी
वेळापूर (ता. माळशिरस) येथील इंग्लिश स्कूलच्या सन १९८३-८४ च्या दहावी बॅचमधील माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी तब्बल ४२ वर्षांनंतर पुन्हा एकत्र आले आणि जुन्या आठवणींना उजाळा देणारा भावनिक स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. अनेक वर्षांनंतर बालपणीचे मित्र-मैत्रिणी भेटल्याने वातावरणात आनंद, आपुलकी आणि आठवणींचा ओलावा दाटून आला होता. अनेकांच्या डोळ्यांत नकळत आनंदाश्रू तरळले आणि जुन्या मैत्रीच्या नात्यांना नवसंजीवनी मिळाली.
हा अविस्मरणीय स्नेहमेळावा इंग्लिश स्कूल, वेळापूर येथे मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हनुमंत मेलगे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. भारत गायकवाड उपस्थित होते. यावेळी त्या काळातील शिक्षक एस. एम. माने, पी. एम. काळे, यादव सर, रामचंद्र पाचपुंड, प्रतापराव पाटील तसेच प्राचार्य आर. बी. पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात दलित मित्र कदम गुरुजी व सरस्वती देवी यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी मेजर भागवत आडत, मेजर शहाजी शिंदे आणि मेजर महादेव देवकते यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
यानंतर झालेल्या मनोगत कार्यक्रमात यशवंतराव माने-देशमुख, तानाजी ननवरे, काशीद सर, दादा कुलकर्णी, राजेंद्र बावळे, सुजाता बनसोडे यांच्यासह अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. शिक्षकांनी दिलेली शिस्त, संस्कार आणि शिक्षणाची उज्ज्वल परंपरा यांचा त्यांनी कृतज्ञतेने उल्लेख केला.
अध्यक्षीय भाषणात हनुमंत मेलगे म्हणाले, “ज्या शाळेने आपल्याला घडवले आणि ज्या शिक्षकांनी आयुष्याला दिशा दिली, त्यांना कधीही विसरू नका. शिक्षणाबरोबरच संस्कारांची शिदोरी पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे ही आपली जबाबदारी आहे. आमच्या काळात विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी शिक्षकांनी खूप मेहनत घेतली. प्रसंगी कठोर शिस्त लावली; मात्र त्यातूनच अनेक विद्यार्थी जीवनात यशस्वी झाले.”
प्रा. भारत गायकवाड यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “दलित मित्र कदम गुरुजी यांनी वेळापूरमध्ये शिक्षणाची ज्योत प्रज्वलित केली म्हणून हजारो विद्यार्थ्यांचे आयुष्य उजळले. माळशिरस तालुक्यात साहित्य चळवळ उभी करण्यासाठी मी प्रयत्न केले आणि त्याला चांगले यश मिळाले.”
प्राचार्य आर. बी. पवार म्हणाले, “आज इंग्लिश स्कूल वेळापूरमध्ये सुमारे दोन हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि शिस्त टिकवून ठेवण्यासाठी संस्था सातत्याने प्रयत्नशील आहे. काळे सरांनी वेळापूरमध्ये खो-खोचे रोपटे लावले आणि संस्थेने त्याचे मोठ्या वृक्षात रूपांतर केले. आज अनेक विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावर खेळत आहेत.”
“अशा स्नेहमेळाव्यांमुळे जुन्या मित्रांच्या भेटीगाठी होतात, विचारांची देवाणघेवाण होते आणि आपलेपणाचे नाते अधिक दृढ होते,” अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी मुख्याध्यापक उरणे यांनी प्रभावी शैलीत केले. या स्नेहमेळाव्यास माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जुन्या आठवणींनी भारावलेल्या या मैत्रीच्या सोहळ्याने उपस्थितांच्या मनात कायमस्वरूपी घर केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button