सोलापूरच्ची कन्या रागिनी भांडेकर मुंबई विद्यापीठात प्रथम
मेहनत, जिद्द आणि बुद्धिमत्तेचा सुवर्णठसा :

मेहनत, जिद्द आणि बुद्धिमत्तेचा सुवर्णठसा : सोलापूरच्ची कन्या रागिनी भांडेकर मुंबई विद्यापीठात प्रथम
सोलापूर : सोलापूरच्या कु. रागिनी रमेश भांडेकर यांनी मुंबई विद्यापीठाच्या एमबीए अंतिम वर्ष परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. वेलिंगकर कॉलेज, माटुंगा (मुंबई) येथून त्यांनी एमबीएचे शिक्षण पूर्ण केले असून ‘रिसर्च अँड बिझनेस अॅनालिसिस अँड ऑपरेशन्स’ (RBA) या विशेष शाखेत त्यांनी विद्यापीठात अव्वल स्थान पटकावले आहे. त्यांच्या या यशामुळे सोलापूर शहराच्या शैक्षणिक क्षेत्रात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
रागिनी भांडेकर यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण सोलापूर येथील सेंट जोसेफ हायस्कूलमध्ये झाले. शालेय जीवनापासूनच त्या अभ्यासू, जिद्दी व गुणवत्ता संपन्न विद्यार्थिनी म्हणून ओळखल्या जात होत्या. दहावीनंतर त्यांनी उच्च शिक्षणासाठी सोलापूरमधील वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे प्रवेश घेतला. तेथून त्यांनी बी.कॉम्प्युटर सायन्स पदवी डिस्टिंक्शनसह उत्तीर्ण केली.
यानंतर व्यवस्थापन क्षेत्रात करिअर करण्याच्या उद्देशाने त्यांनी मुंबईतील नामांकित वेलिंगकर कॉलेजमध्ये एमबीएसाठी प्रवेश घेतला. अभ्यासातील सातत्य, संशोधनाची आवड आणि विश्लेषणात्मक दृष्टिकोन यांच्या जोरावर त्यांनी एमबीए अंतिम वर्षात मुंबई विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळवला. विशेष म्हणजे ‘रिसर्च अँड बिझनेस अॅनालिसिस अँड ऑपरेशन्स’ या विषयात त्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत हे यश संपादन केले आहे.
रागिनी यांच्या वडिलांनी शिक्षण खात्यात शाळा न्यायाधिकरण, सोलापूर येथे लघुलेखक पदावर कार्य करत प्रामाणिक सेवा बजावली असून ते सेवानिवृत्त झाले आहेत. मुलीच्या या यशामुळे भांडेकर कुटुंबावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
रागिनी भांडेकर यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शैक्षणिक, सामाजिक व विविध क्षेत्रांतून त्यांचे कौतुक होत असून अनेकांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.



