क्राईम

अक्कलकोटमध्ये लाच स्वीकारताना दोन पोलिसांसह तिघे जण अटकेत

सोलापूर एसीबीची मोठी कारवाई

 

अक्कलकोट :- अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याशी संबंधित एका प्रकरणात स्कॉर्पिओ वाहन व मोबाईल परत देण्यासाठी तसेच तक्रारदाराच्या नातेवाईकांना मदत करण्याच्या मोबदल्यात १ लाख २० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यातील दोन पोलिस कर्मचारी आणि त्यांच्यावतीने काम करणारा एक खासगी व्यक्ती एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे.
या प्रकरणातील आरोपींमध्ये पोलीस हवालदार राजशेखर रामचंद्र कोळी, पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मीकांत दत्तात्रय देडे आणि खासगी व्यक्ती आकाश शरण्णाप्पा काडरामे यांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराची स्कॉर्पिओ गाडी त्यांच्या मित्राने फिरण्यासाठी घेतली होती. संबंधित वाहनाचा अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यात वापर झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी तक्रारदाराच्या लहान भावाचा मोबाईल आणि स्कॉर्पिओ वाहन ताब्यात घेतल्याचे सांगितले.
तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या वडिलांचे आणि काकांचे नाव गुन्ह्यात टाकून अटक करण्याची भीती दाखवण्यात आली. तसेच वाहन आणि मोबाईल परत मिळवून देण्यासाठी व नातेवाईकांना मदत करण्याच्या बदल्यात सुरुवातीला १ लाख ४० हजार रुपयांची मागणी करण्यात आली. नंतर तडजोडीनंतर ही रक्कम १ लाख २० हजार रुपयांवर निश्चित करण्यात आल्याचे एसीबीच्या तपासात निष्पन्न झाले.
एसीबीने १५ जून रोजी तक्रारीची पडताळणी केली असता लाचेच्या मागणीची पुष्टी झाली. त्यानंतर त्याच दिवशी सापळा रचण्यात आला. अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यासमोर आरोपी आकाश काडरामे याने पोलिस कर्मचाऱ्यांच्या वतीने १ लाख २० हजार रुपयांची रक्कम पंचांसमक्ष स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. या प्रकरणात संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांविरुद्धही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७, ७-अ आणि १२ अन्वये कारवाई करण्यात येत आहे. पुढील तपास एसीबीकडून सुरू आहे.
ही कारवाई एसीबी पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील, अपर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले आणि पोलीस उपअधीक्षक प्रशांत चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र लांभाते व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
सदरच्या कारवाईमुळे अक्कलकोट शहर व तालुक्यातील पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे
कोणताही शासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांच्यावतीने काम करणारा एजंट कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त लाचेची मागणी करत असल्यास नागरिकांनी तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन एसीबीने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button