शाळा प्रवेशोत्सवाच्या निमित्ताने लोकप्रतिनिधी, सनदी अधिकारी व शिक्षण विभागाचा जिल्हाभर जल्लोषमय दौरा; विद्यार्थ्यांच्या स्वागताने दुमदुमल्या जिल्हा परिषद शाळा

शाळा प्रवेशोत्सवाच्या निमित्ताने लोकप्रतिनिधी, सनदी अधिकारी व शिक्षण विभागाचा जिल्हाभर जल्लोषमय दौरा; विद्यार्थ्यांच्या स्वागताने दुमदुमल्या जिल्हा परिषद शाळा
सोलापूर, दि. १५ जून : शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रारंभी आयोजित करण्यात आलेल्या शाळा प्रवेशोत्सवाच्या निमित्ताने प्राथमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद सोलापूर यांच्या वतीने जिल्हाभर उत्साहपूर्ण वातावरणात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. लोकप्रतिनिधी, समिती सभापती, आमदार तसेच वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद शाळांना भेटी देत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत केले. यामुळे जिल्हाभरातील शाळा परिसरात आनंद, उत्साह आणि नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले.
जिल्हा परिषद सोलापूरचे अध्यक्ष दीपक अरुण वैद्य यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुसळंब येथे भेट देऊन प्रवेशोत्सवात सहभाग घेतला, तर जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मार्डी येथे विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
सांगोला तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजुरी येथे शिक्षण व आरोग्य सभापती चेतनसिंह केदार सावंत यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा होटगी (मराठी) येथे कृषी सभापती रामप्पा चिवडशेट्टी यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुली क्रमांक २, अकलूज येथे समाजकल्याण सभापती सौ. संस्कृती राम सातपुते यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.
दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष बापू देशमुख यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंगळगी येथे भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मोहोळ तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोन्हेरी येथे विधानसभा सदस्य राजू खरे यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.
विशेष आकर्षण ठरले ते सांगोला तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एकतपूर येथील शाळा प्रवेशोत्सवाचे. सांगोलाचे आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या उपस्थिती राहिले तसेच जिल्ह्यातील प्राथमिक शाळा विद्यार्थ्यांची ट्रॅक्टर व बग्गीमधून भव्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात, फुलांच्या वर्षावात आणि उत्साहपूर्ण वातावरणात नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थी यांच्या मोठ्या सहभागामुळे एकतपूर येथील प्रवेशोत्सव हा जिल्ह्यातील आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.
सनदी अधिकाऱ्यांमध्ये मा. जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मजरेवाडी येथे भेट देऊन विविध शैक्षणिक उपक्रमांचा आढावा घेत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख हे देखील उपस्थित होते. त्यांनी शिक्षकांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थी-केंद्रित अध्यापन आणि शाळा पूर्वतयारीबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पापरी येथे भेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले तसेच शैक्षणिक सुविधांची पाहणी केली. पोलीस उपायुक्त सौ. वृष्टी जैन यांनी मोहोळ तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पेनूर येथे भेट दिली, तर सहाय्यक पोलीस अधीक्षक सौ. अंजना कृष्णा व्ही.एस. यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वीट येथे उपस्थित राहून विद्यार्थ्यांना नव्या शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या.
जिल्हाभरातील विविध शाळांमध्ये नवागत विद्यार्थ्यांचे औक्षण, पुष्पगुच्छ देऊन स्वागत, गोड पदार्थांचे वाटप, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रभातफेरी तसेच आनंददायी वातावरणात शैक्षणिक वर्षाची सुरुवात करण्यात आली. लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी, पालक, ग्रामस्थ आणि शिक्षक यांच्या सक्रिय सहभागामुळे शाळा प्रवेशोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
“प्रत्येक बालक शाळेत, प्रत्येक बालक गुणवत्तापूर्ण शिक्षणाकडे” हा संदेश देत जिल्हा परिषद सोलापूरच्या प्राथमिक शिक्षण विभागाने नव्या शैक्षणिक वर्षाची दिमाखदार सुरुवात केली असून, लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या सहभागामुळे जिल्ह्यातील शिक्षण चळवळीला नवी ऊर्जा प्राप्त झाली आहे.


