March 12, 2026

ShivNirnay

हिंदवी बाण्याचे मराठी दैनिक

पोलीस असल्याची थाप मारून २ लाख ३२ हजारांच्या सोन्याच्या बांगड्या पळवल्या

शिव निर्णय / सोलापूर : पोलीस असल्याची थाप मारत लहान मुलांची अंगठी खरेदी करण्याच्या बहाण्याने दुकानात आलेल्या जोडगोळीने सराफाची नजर चुकवून ड्रावरमधील सुमारे ०२ लाख ३२ हजार रुपयाहून अधिक किमतीचे सोन्याच्या बांगड्या चोरून नेल्या.ही घटना पूर्व मंगळवार पेठ येथील मनोज ज्वेलर्समध्ये १७ नोव्हेंबरच्या दुपारी घडली.याप्रकरणी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे शहर पोलिसांच्या माहिती कक्षाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की,तुळजापूर तालुक्यातील काटगाव येथील रहिवासी तथा सोन्याचे व्यापारी विलास उद्धवराव वेदपाठक (वय-३५) यांच्या मनोज ज्वेलर्स या दुकानात सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने आलेल्या दोघांनी पोलीस असल्याचे सांगून स्वतःची ओळख करून दिली होती.उभयतांनी लहान मुलांची अंगठी घेण्याच्या बहाण्याने,दुकानात थांबल्यावर दुकानातील ड्रॉवर मधून ४०.७५० ग्रॅम वजनाच्या ९१६ हॉलमार्कच्या चार सोन्याच्या बांगड्या चोरून नेल्या.
सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने कल्याण ज्वेलर्समध्ये ०२ महिलांनी अशाच पद्धतीने सोन्याच्या बांगड्या चोरून नेल्या होत्या. त्या आरोपींपैकी एका संशयित महिलेस  गजाआड करण्यात आलं असून तिच्या ताब्यातून त्या बांगड्या हस्तगत करण्यात आल्या. पोलीस उर्वरित आरोपींच्या मागावर असल्याचे बुधवारी गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीत म्हटले आहे.
त्या गुन्ह्याचा उकल होतो न होतो तोच, पुन्हा जवळपास अडीच लाख रुपये किंमतीच्या सोन्याच्या चार बांगड्या चोरीस गेल्याने सुवर्ण बाजारात भयाचे वातावरण आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.