क्राईम
मळोलीहून पाहुण्यांना भेटून परत येत असताना भीषण अपघात
मोटारसायकलवरील पती-पत्नीला आयशरची जोरदार धडक; दोघेही जागीच ठार

मळोलीहून पाहुण्यांना भेटून परत येत असताना भीषण अपघात
मोटारसायकलवरील पती-पत्नीला आयशरची जोरदार धडक; दोघेही जागीच ठार
वेळापूर : वेळापूर शेरी नंबर १ ता. माळशिरस येथील तानाजी शहाजी माने-देशमुख (वय ४६) व त्यांच्या पत्नी जयश्री तानाजी माने-देशमुख (वय ४२) यांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला.
ही दुर्दैवी घटना शुक्रवार, दि. १५ मे २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास घुमेरा ओढा परिसरात घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, पती तानाजी माने-देशमुख व त्यांच्या पत्नी जयश्री तानाजी माने देशमुख हे दोघेजण आपल्या नातलगांना भेटण्यासाठी मळोली (ता. माळशिरस) येथे मोटारसायकल (क्रमांक एमएच ४५ बी ४३१६) वरून गेले होते. पाहुण्यांची भेट घेऊन ते वेळापूरकडे परत येत असताना घुमेरा ओढा येथे त्यांच्या मोटारसायकलला पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर वाहनाने (क्रमांक एमएच १० एडब्ल्यू ४६७०) जोरदार धडक दिली.
या भीषण धडकेनंतर मोटारसायकलवरील दोघेही रस्त्यावर फेकले गेले. अपघात इतका गंभीर होता की तानाजी माने-देशमुख यांच्या डोक्यास, हातास व पायास गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर जयश्री माने-देशमुख यांनाही डोक्यास व हातास गंभीर मार लागून त्या रक्तबंबाळ अवस्थेत मृत झाल्या.
अपघातानंतर संबंधित आयशर वाहनाने नियंत्रण सुटून थेट रोहित शिवाजी चव्हाण (रा. घुमेरा, वेळापूर) यांच्या पानपट्टीला धडक दिल्याने त्यांचेही नुकसान झाले.
घटनेची माहिती मिळताच वेळापूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. वाहतूक पोलीस अंमलदार येल्पले तसेच डायल ११२ पथकावरील पोलीस कर्मचारी नाईक नितीन लिंगडे यांनी तत्काळ मदतकार्य करत जखमींना ॲम्ब्युलन्सद्वारे प्राथमिक आरोग्य केंद्र, वेळापूर येथे हलविले. मात्र डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले.
या प्रकरणी वेळापूर पोलीस ठाण्यात संबंधित आयशर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वेळापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आशिष कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


