महाराष्ट्र

नवरात्रोत्सव : परंपरेचे रंग आणि आदिशक्तीचा जागर

 

शिव निर्णय में प्रकाशनार्थ
‘नवरात्रोत्सव : परंपरेचे रंग आणि आदिशक्तीचा जागर’
नवरात्र म्हणजे आदिशक्तीचा जागर, श्रद्धेचा उत्सव आणि चैतन्याची अनुभूती! या उत्सवाचे धार्मिक महत्त्व जितके आहे, तितकेच त्याचे सामाजिक आणि सांस्कृतिक पैलूही समृद्ध आहेत. काळानुसार सण साजरे करण्याच्या पद्धती बदलतात, त्यांत नवनवीन गोष्टींची भर पडते आणि परंपरांना आधुनिकतेचे रंग लाभतात. नवरात्रातील नऊ रंगांच्या साड्या, गरबा-दांडियाचा उत्साह आणि विविध धार्मिक विधी हे त्याचेच प्रत्यंतर. या बदलांकडे केवळ परंपरेपासून दूर जाणे म्हणून पाहायचे, की त्यांमधून आनंद, सौंदर्य आणि सांस्कृतिक अभिव्यक्तीचे नवे मार्ग शोधायचे? उत्सवाच्या बाह्य रूपाचा स्वीकार करताना त्यामागील मूळ तत्त्वाचे भान राखता आले, तर परंपरा अधिक अर्थपूर्ण होऊ शकते. नवरात्राच्या निमित्ताने याच उत्सवी परंपरा, त्यांमागील भावविश्व आणि आदिशक्तीच्या उपासनेचा व्यापक अर्थ समजून घेण्याचा हा एक प्रयत्न.

खरे तर साडी आणि नवरात्र यांचा थेट धार्मिक संबंध नाही. देवीने महिषासुराशी केलेले युद्ध, तिचे उग्र रूप आणि दुष्ट शक्तींचा केलेला संहार हे नवरात्रोत्सवाच्या मूळ संकल्पनेचे भाग आहेत. रणांगणावर असुरांशी लढणाऱ्या आदिशक्तीचे रूप कल्पनेत आणले, तर ते रक्ताने माखलेले, हातात विविध आयुधे धारण केलेले आणि अन्यायाचा नाश करण्यासाठी सज्ज असलेले असेच असेल. मात्र, मानवी मनाला सौंदर्याचा शोध घेण्याची सहज ओढ असते. म्हणूनच आपण त्या आदिशक्तीच्या रूपातही सौंदर्य शोधतो आणि तिच्या उपासनेत रंग, कला, संगीत, नृत्य आणि अलंकार यांची भर घालतो.

मग नऊ दिवस नऊ रंगांच्या साड्या नेसण्यात वाईट ते काय आहे? उलट, या निमित्ताने महिलांची खरेदीची हौस पूर्ण होते, वस्त्रव्यवसायाला चालना मिळते आणि मैत्रिणी, नातेवाईक यांच्यातील संवाद व आपुलकी वाढते. व्यावसायिकांना त्यातून आर्थिक लाभ होत असेल, तर त्यात गैर काहीच नाही. कारण एखाद्या विशिष्ट निमित्ताने घेतलेली साडी केवळ वस्त्र राहत नाही; ती त्या दिवसाच्या आनंदाची, उत्साहाची आणि आठवणींची साक्षीदार बनते. पुढे अनेक वर्षांनी ती साडी कपाटातून बाहेर काढली, तरी तिच्यासोबत त्या नवरात्रातील आठवणीही जाग्या होतात. त्यामुळे या रंगोत्सवाकडे केवळ दिखावा म्हणून न पाहता आनंद आणि उत्सवप्रियतेची एक सुंदर अभिव्यक्ती म्हणून पाहायला हवे.

मात्र, नवरात्रोत्सवाचे खरे सौंदर्य केवळ बाह्य रंगांमध्ये नाही, तर अंतर्मनात जागृत होणाऱ्या शक्तीमध्ये आहे. नऊ दिवस आपण नवदुर्गेच्या नऊ स्वरूपांची उपासना करतो. प्रत्येक स्वरूपामागे विशिष्ट गुण, जीवनमूल्ये आणि सामर्थ्य दडलेले आहे. देवीची विविध आयुधे ही केवळ युद्धाची साधने नसून दुष्ट प्रवृत्तींचा नाश करण्याची, संकटांचा सामना करण्याची आणि धर्माचे रक्षण करण्याची प्रतीके म्हणूनही पाहता येतात. देवीच्या या स्वरूपांचा अर्थ समजून घेताना आपण आपल्यातील धैर्य, संयम, करुणा, विवेक, आत्मविश्वास आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची शक्ती यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो. खऱ्या अर्थाने देवीची उपासना म्हणजे तिच्या गुणांचा आपल्या जीवनात स्वीकार करणे होय.

दैनंदिन जीवनाच्या धावपळीत दुर्गासप्तशती, देवीमाहात्म्य यांसारख्या ग्रंथांचे नियमित पठण करणे अनेकांना शक्य होत नाही. नवरात्र हा मात्र या ग्रंथांकडे पुन्हा वळण्याचा एक सुंदर अवसर असतो. देवीच्या उपासनेच्या निमित्ताने संस्कृत आणि अभिजात मराठी भाषेतील ग्रंथांचे वाचन होते. त्यातील शब्दसौंदर्य, भावसौंदर्य, काव्यात्मकता आणि देवीच्या विविध रूपांचे वर्णन करणारी कलात्मकता मनाला भावते. वाचनातून भक्तिभाव जागृत होतो आणि आपण त्या भक्तिरसात डुंबून जातो. साहित्याचा आनंद हा ब्रह्मानंदाचा सहोदर मानला जातो, असे म्हणतात. देवीमाहात्म्याचे पठण करताना शब्दांच्या अर्थासोबत भावविश्वाचाही अनुभव येतो. अशा वेळी ग्रंथवाचन ही केवळ धार्मिक कृती न राहता ती मनाला समृद्ध करणारी सांस्कृतिक आणि आध्यात्मिक अनुभूती बनते.

देवीच्या उपासनेतील आणखी एक महत्त्वाचा विधी म्हणजे कुंकुमार्चन. देवीच्या नामस्मरणासह तिच्या मूर्तीवर भक्तिभावाने कुंकू अर्पण केले जाते. या विधीतून श्रद्धा, समर्पण आणि मंगलभाव व्यक्त होतो. पूजेनंतर संकलित झालेले कुंकू महिला वर्षभर अत्यंत श्रद्धेने वापरतात. या कुंकवात त्यांच्यासाठी केवळ धार्मिक पावित्र्य नसते, तर देवीच्या कृपेवरील विश्वास, कुटुंबाच्या कल्याणाची कामना आणि परंपरेशी जोडलेली भावनिक नाळही असते. अशा प्रथा पिढ्यान्पिढ्या चालत आल्यामुळे सांस्कृतिक सातत्य टिकून राहते.

नवरात्रातील आणखी एक आकर्षक पैलू म्हणजे गरबा आणि दांडिया. शेजारच्या गुजरात राज्यातील या लोकपरंपरांचा प्रभाव महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. आज गावोगावी, शहरांमध्ये आणि महाविद्यालयांमध्ये महिला व तरुणी गरबा-दांडियासाठी एकत्र येतात. टिपरीच्या तालावर, दांडियाच्या ठेक्यावर आणि देवीच्या गीतांच्या सुरांवर फेर धरताना आनंदाची एक वेगळीच अनुभूती मिळते. या नृत्यांमधून देवीचे स्मरण होतेच; त्याचबरोबर सामूहिक सहभाग, शारीरिक चैतन्य, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि सामाजिक एकोपा यांनाही चालना मिळते. विविध प्रदेशांच्या परंपरा एकमेकांत मिसळून आपली उत्सवसंस्कृती अधिक समृद्ध होत जाते, याचे हे सुंदर उदाहरण आहे.

अशा प्रकारे पाहिले, तर नवरात्रोत्सव हा केवळ नऊ दिवसांचा धार्मिक सोहळा नाही. तो रंगांचा उत्सव आहे, कलेचा उत्सव आहे, साहित्याचा उत्सव आहे, लोकपरंपरांचा उत्सव आहे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्त्रीशक्तीचा जागर आहे. साडीचे रंग, गरब्याचे ताल, कुंकुमार्चनाची श्रद्धा आणि ग्रंथपठणाचा आनंद हे या उत्सवाचे विविध पैलू आहेत. प्रत्येक पैलूचे स्वतःचे महत्त्व आहे; मात्र या सर्वांच्या केंद्रस्थानी असलेली आदिशक्तीची संकल्पना आपण विसरता कामा नये.

नऊ दिवस नऊ रंगांच्या साड्या नेसताना आपण आपल्या जीवनातही नऊ गुणांचे रंग भरू शकलो, तर नवरात्रोत्सव अधिक अर्थपूर्ण होईल. देवीच्या हातातील आयुधे पाहून अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचे धैर्य मिळाले, तिच्या करुणेतून संवेदनशीलता शिकता आली, तिच्या सामर्थ्यातून आत्मविश्वास जागा झाला आणि तिच्या विजयातून सत्याचा मार्ग स्वीकारण्याची प्रेरणा मिळाली, तर तीच खरी देवीची उपासना ठरेल.

शेवटी, देवीला केवळ मंदिरात शोधण्यापेक्षा स्वतःमध्ये आणि आपल्या सभोवतालच्या प्रत्येक स्त्रीमध्ये तिच्या शक्तीचे दर्शन घेता आले पाहिजे. स्त्रीला सन्मान, समान संधी आणि सुरक्षितता देणे, तिच्या कर्तृत्वाला प्रोत्साहन देणे आणि तिच्या स्वप्नांना बळ देणे, हाच आदिशक्तीच्या पूजेचा व्यापक अर्थ आहे. साडीच्या रंगांपासून सुरू झालेला हा उत्सव जेव्हा विचारांच्या उजेडापर्यंत पोहोचतो, तेव्हा त्याचे खरे सार्थक होते.

कारण नवरात्राचा खरा रंग साडीवर खुलणारा नसतो, तो आपल्या विचारांत, आचरणात आणि स्त्रीशक्तीविषयीच्या आदरात खुलणारा असतो. देवीसमोर लावलेला दिवा काही क्षण परिसर उजळवतो; पण तिच्या सामर्थ्याची ज्योत जर आपल्या अंतःकरणात प्रज्वलित झाली, तर ती संपूर्ण आयुष्याला दिशा देऊ शकते. हाच नवरात्रोत्सवाचा खरा संदेश आणि आदिशक्तीच्या उपासनेचा खरा आनंद!

डॉ. मीना जाधव
जवाहर महाविद्यालय, अणदूर
9960242667

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button