सोलापूर
ऐतिहासिक सात नळाची विहीर व नाना-नानी पार्कची दुरवस्था
गणेशोत्सव तोंडावर, विसर्जन मार्गावरील रस्त्याचीही दुरवस्था

करमाळा रितेश कटारिया:करमाळा शहराचे वैभव असलेले ऐतिहासिक सात नळाची विहीर’ आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळ्याचे साधन असलेले ‘नाना-नानी पार्क’ सध्या प्रशासनाच्या अनास्थेमुळे अत्यंत दुरवस्थेत आहेत. त्यातच आता लाडक्या बाप्पांचे आगमन अवघ्या काही दिवसांवर आले असून, विसर्जनासाठी महत्त्वाच्या असलेल्या या परिसरातील रस्त्यांची चाळण झाली आहे. यामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.ऐतिहासिक वास्तू कचराकुंडीच्या उंबरठ्यावर शहरातील ऐतिहासिक सात नळाची विहीर ही एक प्राचीन आणि वास्तुशास्त्राचा उत्तम नमुना मानली जाते. परंतु सध्या या विहिरीच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर गाळ, प्लास्टिक कचरा आणि घाण साचली आहे. विहिरीच्या भिंतींना तडे गेले असून, तिथे डुकरांचा आणि मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे दरवर्षी या सात नळाच्या विहिरीच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते. गणेशोत्सवासाठी अवघे काही दिवस शिल्लक असतानाही प्रशासनाने या जागेची कोणतीही स्वच्छता केलेली नाही. सर्वात गंभीर बाब म्हणजे, या विसर्जन स्थळाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या खराब रस्त्यामुळे विसर्जन मिरवणुका काढताना सार्वजनिक मंडळांना आणि घरगुती गणपती आणणाऱ्या नागरिकांना मोठ्या अपघाताला सामोरे जावे लागण्याची भीती वर्तवली जात आहे.नाना-नानी पार्कमध्ये झाडा झुडपांचे साम्राज्य दुसरीकडे, ज्येष्ठ नागरिकांसाठी अब्जावधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेले नाना-नानी पार्क आज उजाड झाले आहे. पार्कमधील चालण्याचे ट्रॅक उखडले असून, बसण्याचे बाकडे तुटले आहेत. विजेचे दिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी तिथे अंधाराचे साम्राज्य असते, ज्यामुळे मद्यपी आणि टवाळखोरांचा वावर वाढला आहे. रस्ता दुरुस्तीसह तातडीने स्वच्छतेची मागणी गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी सात नळाच्या विहिरीची स्वच्छता करावी, विसर्जन स्थळाकडे जाणारा रस्ता युद्धपातळीवर दुरुस्त करावा आणि नाना-नानी पार्कची डागडुजी करावी,” अशी आग्रही मागणी करमाळ्यातील नागरिक, इतिहासप्रेमी आणि गणेश मंडळांचे कार्यकर्ते करत आहेत. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास ऐन सणासुदीत नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही देण्यात आला आहे.

