March 12, 2026

ShivNirnay

हिंदवी बाण्याचे मराठी दैनिक

टंचाईच्या गावात पाणी उपलब्ध करण्यासाठी केलेल्या सूक्ष्म नियोजनाची प्रभावी अंमलबजावणी करावी -जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

टंचाईच्या गावात पाणी उपलब्ध करण्यासाठी केलेल्या सूक्ष्म नियोजनाची प्रभावी अंमलबजावणी करावी -जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

सोलापूर, : यावर्षी जिल्ह्यात कमी पाऊस झाल्याने टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण
झालेली आहे. राज्य शासनाने पाच तालुके व 55 महसूल मंडळामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने
टंचाईच्या उपाययोजना राबविल्या जात आहेत. सद्यस्थितीत मार्च महिना संपत येत असून जिल्ह्यात टंचाईची
तीव्रता वाढत जाणार असल्याने सर्व उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांनी टंचाई निर्माण होणाऱ्या प्रत्येक
गावात नागरिकांना पिण्यासाठी पाणी तसेच जनावरांना पाणी व चारा उपलब्ध करून देण्यासाठी सूक्ष्म नियोजन
करून ठेवावे व त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करून टंचाईच्या परिस्थितीवर मात करावी, असे आवाहन
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.
नियोजन भवन येथील सभागृहात आयोजित जिल्ह्यातील टंचाईच्या परिस्थितीच्या अनुषंगाने आढावा
बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हाधिकारी
महसूल अमृत नाटेकर उपस्थित होते. तर सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार ऑनलाईन प्रणालीद्वारे जॉईन
झालेले होते.
जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले की, टंचाईच्या उपाययोजना राबवत असताना ग्रामीण व शहरी
भागात टँकर सुरू करण्याची मागणी आल्यावर त्या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास
अधिकारी व नगरपालिकांचे मुख्य अधिकारी यांनी सर्व बाबींची पडताळणी करून त्या ठिकाणी त्वरित टँकरने
पाणीपुरवठा सुरू होईल याबाबत काळजी घ्यावी. पाण्यासाठी टँकर किती सुरू करावेत याबाबत कोणतीही अडचण
नाही, परंतु टँकरची मागणी आल्यानंतर त्या ठिकाणी टँकरची किती प्रमाणात आवश्यकता आहे याची खात्री करूनच
ते सुरू करावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या.
सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी टंचाईच्या उपाययोजना राबवत असताना यात लोकसभा
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेची कोणतीही अडचण नाही ही बाब लक्षात घेऊन टंचाई
उपाययोजना अत्यंत परिणामकारकपणे राबवून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करावा, असे निर्देश
जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिले. त्याप्रमाणेच उजनी धरणातून पाणीपुरवठा योजनासाठी पाण्याचे आवर्तन
सोडल्यानंतर नदी काठावरून पाण्याचा उपसा होणार नाही यासाठी वीज वितरण कंपनीने वीजपुरवठा खंडित केला
आहे का याची खात्री करावी. वीज कंपनीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसोबत समन्वय ठेवून पाणी उपसा होणार नाही
यासाठी पथके नियुक्त करावीत, असेही त्यांनी निर्देशित केले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी खरीप अनुदान व दुष्काळाच्या अनुषंगाने तालुका
निहाय आढावा घेऊन मार्गदर्शक सूचना दिल्या. तसेच खरीप अनुदानाच्या अनुषंगाने ज्या शेतकऱ्यांचे ई-केवायसी
राहिलेले आहे त्यांचे ई केवायसी तात्काळ करून घेण्याबाबत तहसीलदारांना निर्देशित केले. तर उपजिल्हाधिकारी
महसूल अमृत नाटेकर यांनी टंचाईच्या उपाययोजना राबवण्यासाठी जिल्हास्तरावरून देण्यात आलेल्या सूचनांचे सर्व
संबंधित अधिकाऱ्यांनी पालन करावे व सर्व तालुकास्तरीय यंत्रणाशी परस्पर समन्वय ठेवावा व चारा जिल्ह्याच्या
बाहेर जाणार नाही याची दक्षता घ्यावी, असे सूचित केले.