जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी दरमहा गुणवत्ता कक्षाच्या बैठका घेण्याचे सीईओंचे निर्देश

जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी दरमहा गुणवत्ता कक्षाच्या बैठका घेण्याचे सीईओंचे निर्देश
सोलापूर — जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी व ‘परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स फॉर डिस्ट्रिक्ट’ निर्देशांकात जिल्ह्याची कामगिरी उंचावण्यासाठी प्रत्येक तालुक्यात दरमहा गुणवत्ता कक्षाच्या बैठका घेण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी दिले.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, वेळापूर आणि जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय बैठकीत शैक्षणिक गुणवत्तेचा सर्वंकष आढावा घेण्यात आला. या बैठकीस प्राथमिक
शिक्षणाधिकारी कादर शेख, डायटचे प्राचार्य डॉ. इब्राहिम नदाफ, उपशिक्षणाधिकारी रुपाली भावसार, माध्यमिक उपशिक्षणाधिकारी सुरेश वाघमारे, ज्येष्ठ अधिव्याख्याते अरुण पाटील, शोभा मिसाळ, डॉ. प्रभाकर बुधाराम, डॉ. गजेंद्र जमादार तसेच सर्व गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्तीमध्ये सातत्याने
वाढ करण्यासाठी मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान, गुणवत्तापूर्ण अध्यापन, डिजिटल शिक्षण, शाळा सुरक्षा, विद्यार्थ्यांची नियमित उपस्थिती, शैक्षणिक पर्यवेक्षण आणि माहितीची अचूक नोंद यावर विशेष भर देण्याचे निर्देश दिले. प्रत्येक शाळेने गुणवत्ता सुधारणा आराखडा प्रभावीपणे राबवून विद्यार्थीकेंद्रित शिक्षणाला प्राधान्य द्यावे, अशा सूचना कुशल जैन यांनी दिल्या.
तसेच पीएम श्री शाळा, निपुण महाराष्ट्र अभियान, डॉ. जयंत नारळीकर गणित व विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रम, शिक्षकांचे ५० तासांचे सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास प्रशिक्षण, आयडॉल शिक्षक उपक्रम, डिजिटल शिक्षण, समुदाय सहभाग आणि शाळा गुणवत्ता तपासणी या उपक्रमांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
यू-डायस प्लस, परख आणि प्रबंध या प्रणालीमध्ये माहिती वेळेत व अचूक भरणे, डेटा पडताळणी, उपचारात्मक अध्यापन, सतत सर्वकष मूल्यमापन, माहिती व संप्रेषण तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि शाळा विकास आराखड्याची काटेकोर अंमलबजावणी यावरही या बैठकीत विशेष भर देण्यात आला.


