आदिला नदीच्या रेड लाईन आणि ब्ल्यू लाईन रेखांकनाचा प्रश्न पुन्हा एकदा रखडण्याची चिन्हे
पाटबंधारे विभागाचा प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर प्रलंबित

आदिला नदीच्या रेड लाईन आणि ब्ल्यू लाईन रेखांकनाचा प्रश्न पुन्हा एकदा रखडण्याची चिन्हे पाटबंधारे विभागाचा प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर प्रलंबित
सोलापूर —पावसाळ्याला सुरुवात होताच गेल्या वर्षभर चर्चेत असलेल्या आदिला नदीच्या रेड लाईन आणि ब्ल्यू लाईन रेखांकनाचा प्रश्न पुन्हा एकदा रखडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. पाटबंधारे विभागाने तयार केलेला प्रस्ताव वरिष्ठ स्तरावरील मंजुरीसाठी पाठविला असला, तरी अद्याप अंतिम मान्यता मिळालेली नाही. त्यातच पावसाळा सुरू झाल्याने प्रत्यक्ष रेखांकन आणि मार्किंगची प्रक्रिया किमान चार महिने पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीत आदिला नदीला आलेल्या पुरामुळे परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते. या पार्श्वभूमीवर महापालिकेने पाटबंधारे विभागाकडे रेड लाईन व ब्ल्यू लाईन निश्चित करण्याची मागणी केली होती. त्यानुसार सर्वेक्षण पूर्ण करून प्रस्ताव तयार करण्यात आला. आयआयटी मुंबईच्या तांत्रिक पडताळणीनंतर तो अंतिम मंजुरीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे.
महापालिकेने यापूर्वी पाटबंधारे विभागाकडून अधिकृत रेड-ब्ल्यू लाईन रेखांकन प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार १५ दिवसांत प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी भूमिका जाहीर केली होती.मात्र, अंतिम मंजुरी आणि पावसाळ्यातील विलंबामुळे ही प्रक्रिया सध्या पुन्हा लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत.
, मंजुरीची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसल्याने अंतिम पूररेषा जाहीर होऊ शकलेली नाही. पावसाळ्यात नदीपात्रातील प्रत्यक्ष मोजणी व मार्किंग शक्य नसल्याने आता ही प्रक्रिया पावसाळ्यानंतरच सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अंतिम रेड लाईन आणि ब्ल्यू लाईन निश्चित झाल्यानंतर आदिला परिसरातील हजारो घरे, बांधकामे आणि भूखंड पूररेषेत येण्याची शक्यता असल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. अनेक बांधकाम परवानग्याही अंतिम रेखांकनाच्या प्रतीक्षेत प्रलंबित आहेत. त्यामुळे पूरधोका, विकासकामे आणि संभाव्य अतिक्रमण कारवाईबाबतची अनिश्चितता आणखी काही महिने कायम राहणार असल्याचे चित्र आहे.
अदिला नदी की नाला हा यक्षप्रश्न अदिला नदीयात्रातील बांधकामांचे भवितव्य अदिला नदी की नाला यावर ठरणार आहे.अदिला नदीचे रेखांकन झाल्यावर पूररेषा निश्चीत होऊन कीती बांधकामे पूररेषेत येतात तेही कळणार आहे.


