ग्रामपंचायतींच्या विहिरीचे खोलीकरण आणि गाळ काढा : जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य

ग्रामपंचायतींच्या विहिरीचे खोलीकरण आणि गाळ काढा : जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य यांचे आदेश
सोलापूर : एल निनोच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या विहिरीचे खोलीकरण आणि गाळ काढण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य यांनी दिले आहे.
शिवरत्न सभागृहात जल व्यवस्थापन व स्वच्छता समितीची मासिक सभा पार पडली. यावेळी अध्यक्ष वैद्य यांनी आदेश दिले आहेत. यावेळी अतिरिक्त सीईओ संदीप कोहिणकर, सभापती रामप्पा चिवडशेट्टी, झेडपी सदस्य सिद्धराम शिवमूर्ती, गीतांजली साळुंखे, नंदकुमार काळे, शनमुखी कोरके आदी उपस्थित होते.
अध्यक्ष म्हणाले, एल निनोमुळे पाऊस
कमी पडणार आहे. त्यामुळे पाणीटंचाई भासणार आहे. पाणीटंचाई भासू नये, यासाठी ग्रामपंचायतीकडून पाणीपुरवठा करणार्या विहिरी ५० फुटापेक्षा जास्त खोल करण्यात येणार आहे. तसेच जेथे गरज असेल तेथील विहिरीतील गाळ काढण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
मे २०२६ अखेर सोलापूर जिल्ह्यातील सरासरी भूजल पातळीत ०.१८ मीटरने वाढ झाल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. महावितरण विभागाने मध्यम व लघु सिंचन प्रकल्पांसह सर्व पिण्याच्या पाणीपुरवठा योजनांना अखंडित वीजपुरवठा देण्याची दक्षता घ्यावी, विशेषतः नदीकाठावरील योजनांचा वीजपुरवठा कोणत्याही परिस्थितीत खंडित होणार नाही, यासाठी आवश्यक नियोजन करण्याचे निर्देश अध्यक्षांनी दिले.
जिल्ह्यातील पाणीटंचाईची सद्यस्थिती, सुरू असलेले व प्रस्तावित टैंकर, पाणीपुरवठा योजनांची स्थिती याचा तालुकानिहाय आढावा घेण्यात आला. पाणीपुरवठा योजनांच्या विहिरींचे खोलीकरण आवश्यक असलेल्या ठिकाणांचे सर्वेक्षण करून वस्तुनिष्ठ अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश अध्यक्ष वैद्य यांनी दिले आहेत.
गाळयुक्त धरण-गाळमुक्त शिवार अभियान,
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, जलयुक्त शिवार अभियान, मध्यम व लघु प्रकल्पांतील पाणीसाठा, ग्रामीण पाणीपुरवठा योजना तसेच मनरेगा अंतर्गत सुरू असलेल्या जलसंधारण कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.


