मुंबई, दि. १२: केंद्रीय निवडणूक आयोगाने महिलांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘महिला नियंत्रित मतदान केंद्र’ स्थापनेचे निर्देश दिले आहेत. यानुसार आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातील ४२६ मतदान केंद्रांचे संपूर्ण नियंत्रण महिलांकडे असणार आहे. या निर्णयामुळे महिलांच्या मतदानातील सक्रियतेत वाढ होण्याची अपेक्षा आहे.
नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक ४५ महिला नियंत्रित मतदान केंद्रे असणार आहेत, तर जळगावमध्ये ३३, गोंदिया ३२, सोलापूर २९, आणि मुंबई उपनगरात २६ अशी महिला केंद्रे असतील. वाशिम, सिंधुदुर्ग, गडचिरोली आणि हिंगोली येथे प्रत्येकी फक्त ३ महिला नियंत्रित केंद्रे ठेवण्यात आली आहेत.
या केंद्रांमध्ये पोलिसांपासून ते निवडणूक प्रक्रियेतील अधिकारी- कर्मचारी सर्व महिला असणार आहेत. ही व्यवस्था लैंगिक समानतेची बांधिलकी आणि महिलांच्या रचनात्मक सहभागाचा भाग म्हणून करण्यात आली आहे. तसेच, निवडणूक आयोगाने निर्देश दिले आहेत की या केंद्रांवर कोणत्याही विशिष्ट राजकीय पक्षाच्या रंगाचा वापर केला जाणार नाही, ज्यामुळे केंद्रांची निष्पक्षता राखली जाईल.
महिला मतदान केंद्रांच्या निवडीवेळी सुरक्षितता हा महत्त्वाचा घटक मानला गेला आहे. याकरिता, संवेदनशील केंद्रे टाळून, तहसील कार्यालये, पोलीस स्थानकांच्या जवळील केंद्रांची निवड करण्यात आली आहे, ज्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांना सहज संपर्क साधता येईल.
जिल्हानिहाय महिला नियंत्रित मतदान केंद्रे:
- अहमदनगर – १२
- अकोला – ६
- अमरावती – ८
- औरंगाबाद – १३
- बीड – ८
- भंडारा – ८
- बुलढाणा – ७
- चंद्रपूर – ९
- धुळे – ५
- जालना – ६
- कोल्हापूर – १०
- लातूर – ६
- मुंबई शहर – १२
- नागपूर – १३
- नांदेड – ९
- नंदुरबार – ४
- उस्मानाबाद – ४
- पालघर – ६
- परभणी – ८
- पुणे – २१
- रायगड – ९
- रत्नागिरी – ६
- सांगली – ८
- सातारा – १७
- ठाणे – १८
- वर्धा – ९
- यवतमाळ – ७
‘महिला नियंत्रित मतदान केंद्र’ हा उपक्रम महिलांच्या सामाजिक, आर्थिक, आणि राजकीय सहभागाला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.



More Stories
राज्य सीईटी आता वर्षातून दोन वेळा; पीसीएम, पीसीबी आणि एमबीए अभ्यासक्रमांसाठी मोठा निर्णय
उबाठा व काँग्रेसमधील दुराव्यामुळे सोलापूर महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीला बसणार खीळ
राष्ट्रीय एकता दौड कार्यक्रमास रायगडकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद