क्राईम

धाब्यांवर दारु पिणे पडले महागात 2 होटेलचालकांसह सहा मद्यपींविरूद्ध गुन्हे दाखल

शिव निर्णय / सोलापूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी सोलापूर शहर परिसरातील होटेल जगदंबा व स्वागत सावजी या ठिकाणी सोमवारी टाकलेल्या धाडीत मा. न्यायालयाने दोन हॉटेल चालकांसह सहा मद्यपी ग्राहकांना 68 हजारांचा दंड ठोठावला.
सविस्तर वृत्त असे की, सोमवारी (ता. 27 नोव्हेंबर) सायंकाळच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दुय्यम निरिक्षक उषाकिरण मिसाळ यांच्या पथकाने सोलापूर- हैदराबाद रोडवरील दहिटणे परिसरातील हॉटेल जगदंबा याठिकाणी छापा टाकला असता होटेल चालक सिद्धाराम बापूराव नारायणे, वय 39 वर्षे हा ग्राहकांना मद्य पिण्याची व्यवस्था उपलब्ध करुन देत असतांना आढळून आल्याने त्याचेसह 3 मद्यपी ग्राहक खाजा रमजान पठाण, संदिप नेरु राठोड व संतोष शिवाजी पवार यांना अटक करण्यात आली. तसेच एका अन्य कारवाईत दुय्यम निरिक्षक कृष्णा सुळे यांनी सोलापूर-पुणे महामार्गावरील बाळे परिसरात होटेल स्वागत सावजी या ठिकाणी छापा टाकून होटेल चालक पुंडलिक सुभाष काटवा, वय 26 वर्षे व 3 मद्यपी ग्राहक नामे सुनिल शंकर भोसले, संदिपकुमार लटोरा कुशवाहा व प्रविण विलास घाटे यांना अटक केली. दोन्ही गुन्ह्यांचे दोषारोपपत्र मंगळवारी मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी दारूबंदी न्यायालय श्रीमती नम्रता बिरादार यांचे न्यायालयात सादर केले असता हॉटेल चालकास प्रत्येकी 25 हजार रुपये दंड व सहाही मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी तीन हजार रुपये दंड असा एकूण अडुसष्ट हजारांचा दंड ठोठावण्यात आला.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली निरिक्षक राहूल बांगर, दुय्यम निरीक्षक उषाकिरण मिसाळ, कृष्णा सुळे, सहायक दुय्यम निरिक्षक अलीम शेख, जवान किरण खंदारे, शोएब बेगमपुरे, चेतन व्हनगुंटी यांच्या पथकाने पार पाडली.
आवाहन
ढाब्यांवर दारु विक्री करणे किंवा ग्राहकांना दारु पिण्याची व्यवस्था उपलब्ध करुन देणे तसेच त्याठिकाणी बसून दारु पिणे महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा आहे. याचे उल्लंघन करणा-या धाब्यांची या विभागाकडून सातत्याने तपासणी सुरु असून याचे उल्लंघन करणा-या ढाबा चालक व ग्राहकांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल, असा इशारा राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक नितीन धार्मिक यांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button