पंढरपूर येथील शनी मंदिरात शनी जयंती व शनि अमावास्यानिमित्त भाविकांची मोठी गर्दी

पंढरपूर येथील शनी मंदिरात शनी जयंती व शनि अमावास्यानिमित्त भाविकांची मोठी गर्दी
पंढरपूर : शनी जयंती आणि शनि अमावास्यानिमित्त विठ्ठल मंदिरासमोरील तसेच पंढरपूर शहरातील सांगोला रोडवरील शनी मंदिरात शनिवारी पहाटेपासूनच भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
शनीदेवाच्या दर्शनासाठी तसेच विशेष पूजा-अर्चा करण्यासाठी शनिवारी दिवसभरात तालुक्यासह परिसरातील हजारो भाविक येथील शनी मंदिरात दाखल झाले होते. यामुळे मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने फुलून गेला होता.
भाविकांची गर्दी लक्षात घेता स्वयंसेवकांकडून दर्शन रांगेचे नियोजन करण्यात आले होते. याचबरोबर काही ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
शनी जयंती आणि शनि अमावस्यानिमित्त पहाटे काकड आरतीने धार्मिक कार्यक्रमांची सुरुवात झाली. त्यानंतर अभिषेक, तेल अर्पण, नवग्रह पूजा, शनी मंत्र पठण आणि महाआरतीचे आयोजन करण्यात आले. अनेक भाविकांनी शनीदेवाला काळे तीळ, तेल, काळे वस्त्र आणि फुले अर्पण करून आपल्या मनोकामना व्यक्त केल्या. दिवसभर मंदिरात दर्शनासाठी रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले.
शनि अमावास्येचे विशेष महत्त्व लक्षात घेऊन अनेक भक्तांनी उपवास, जप आणि दानधर्म केले. काही भाविकांनी गरजू नागरिकांना अन्नदानही केले. मंदिर परिसरात भजन, नामस्मरण आणि धार्मिक कार्यक्रमांमुळे वातावरण अधिक भक्तिमय झाले होते.
दरवर्षीप्रमाणे यंदाही शनी जयंती आणि शनि अमावास्यानिमित्त पंढरपुरातील शनी मंदिरात मोठ्या श्रद्धेने उत्सव साजरा करण्यात आला. श्रद्धा, भक्ती आणि धार्मिक उत्साहाचे दर्शन दिवसभर मंदिर परिसरात घडत होते.



