रास्त भाव धान्य दुकानांमधून ऑफलाईन पध्दतीने लाभार्थ्यांना धान्य उपलब्ध होणार
रायगड :- राज्यात माहे जुलै पासून रास्तभाव दुकानांमधील ई-पॉस मशीनमधून अन्नधान्य वितरण करताना सातत्याने उद्भवणाऱ्या सर्व्हर समस्येमुळे धान्य वितरणात तांत्रिक अडचणी येत असल्याने राज्यातील सर्व्हरशी संबंधित तांत्रिक अडचणीचे निराकरण होईपर्यंत एक विशेष बाब म्हणून माहे जुलै व ऑगस्ट 2024 करीता ऑफलाईन धान्य वितरणास शासनाने परवानगी दिली असून यामुळे ऑफलाईन पध्दतीने लाभार्थ्यांना धान्य उपलब्ध होणार आहे, असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनवणे यांनी दिली आहे.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत लक्ष्यनिर्धारीत सार्वजनिक वितरण प्रणालीमार्फत ई-पॉस मशीनद्वारे लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण करुन (बायोमेट्रिक ओळख पटवून) धान्य वितरण करण्याचे शासनाचे निर्देश आहेत.
ज्या लाभार्थ्यांना माहे जुलै 2024 चे धान्य मिळालेले नाही अशा लाभार्थ्यांना माहे ऑगस्ट 2024 मध्ये देखील धान्याचा लाभ घेता येणार आहे. याअनुषंगाने सर्व तहसिल कार्यालयांना रास्त भाव धान्य दुकानांतून ऑफलाईन धान्य वितरण करण्याबाबत सुचना देण्यात आल्या आहेत. तसेच सणासुदीचे दिवस असल्याने शिधापत्रिकाधारकांची कोणतीही गैरसोय होणार नाही व कोणताही पात्र लाभार्थी धान्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याच्या स्पष्ट सुचना पुरवठा यंत्रणा व स्वस्त धान्य दुकानदार यांना दिल्या आहेत. लाभार्थ्यांनी आपल्या शिधापत्रिकेच्या प्रकारानुसार देय असलेल्या धान्याची उचल करावी.