सोलापूर

निवडणूक प्रचारातील जाहिरातींवर नियंत्रणासह पेड न्यूजच्या प्रकरणांवर समिती ठेवणार लक्ष

राजकीय पक्ष व उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियावर जाहिरात प्रसारणापूर्वी जाहिरातीचे प्रमाणिकरण करून घेणे अनिवार्य

 

विधान परिषद निवडणुकीसाठी सोलापूर जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समिती (MCMC) गठीत निवडणूक प्रचारातील जाहिरातींवर नियंत्रणासह पेड न्यूजच्या प्रकरणांवर समिती ठेवणार लक्ष
राजकीय पक्ष व उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियावर जाहिरात प्रसारणापूर्वी जाहिरातीचे प्रमाणिकरण करून घेणे अनिवार्य

सोलापूर, : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विधान परिषद पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक-२०२६ च्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यात जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समिती (Media Certification and Monitoring Committee-MCMC) गठीत करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी एस. कार्तिकेयन यांनी प्राप्त अधिकारानुसार या समितीची स्थापना केली आहे.
या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक अधिकारी एस. कार्तिकेयन असून अतिरिक्त सहाय्यक निवडणूक अधिकारी (उत्तर सोलापूर २४९ विधानसभा मतदारसंघ), कार्यक्रम अधिकारी सोमेश्वर पाटील, आकाशवाणी सोलापूर, पोलीस निरीक्षक भालचंद्र ढवळे, सायबर पोलीस ठाणे, सोलापूर तसेच डॉ. श्रीराम दगडू राऊत, प्राध्यापक, संगणकशास्त्र विभाग, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ हे सदस्य आहेत. जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के हे समितीचे सदस्य सचिव आहेत.
समितीकडे इलेक्ट्रॉनिक व छापील माध्यमांमधील निवडणूक जाहिरातींच्या परवानगीसाठी प्राप्त होणारे अर्ज स्वीकारण्यात येणार असून, सदस्य सचिवांकडे प्राप्त प्रस्तावांची समितीमार्फत छाननी केली जाईल. समितीच्या निर्णयानुसार संबंधित अर्जदारास मंजुरीचे प्रमाणपत्र अथवा नामंजुरीचे पत्र देण्यात येणार आहे.
निवडणूक आचारसंहितेच्या कालावधीत सोशल मीडिया, केबल नेटवर्क, आकाशवाणी, एफएम रेडिओ, दूरदर्शन वाहिन्या तसेच वर्तमानपत्रांमधून प्रसारित होणाऱ्या निवडणूक प्रचाराच्या जाहिरातींवर नियंत्रण ठेवणे, जाहिरातींना नियमानुसार परवानगी देणे तसेच पेड न्यूजच्या प्रकरणांमध्ये आवश्यक कार्यवाही करणे, ही समितीची प्रमुख कामे राहणार आहेत. भारत निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या मार्गदर्शक सूचनांनुसार समितीचे कामकाज करण्यात येणार आहे.
जाहिरात प्रामाणिकरण करण्यासाठी संपर्क करावा
जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीचे कार्यालय जुने जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रशासकीय इमारतीमधील तळमजला येथील जिल्हा माहिती कार्यालय सोलापूर येथे आहे. तरी राजकीय पक्ष तसेच उमेदवार किंवा उमेदवार प्रतिनिधी यांनी राजकीय जाहिराती प्रमाणित करून घेण्यासाठी समिती कार्यालयात संपर्क करावा असे आवाहन करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button