सोलापूर

निमगाव बंद ; शेतकरी आक्रमक, परिसरात तणावपूर्ण वातावरण !

शक्तीपीठ महामार्ग सर्व्हेक्षणापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; के. के.पाटील, अध्यक्ष अजित बोरकर ताब्यात   

 

शक्तीपीठ महामार्ग सर्व्हेक्षणापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; शक्तिपीठ विरोधी समितीचे प्रमुख के. के. पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष अजित बोरकर ताब्यात   !
निमगाव बंद ; शेतकरी आक्रमक, परिसरात तणावपूर्ण वातावरण   !
वेळापूर प्रतिनिधी
प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाच्या सर्व्हेक्षणाला माळशिरस तालुक्यात सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांचा तीव्र विरोध होत आहे. आज माळशिरस तालुक्यातील निमगाव येथे या महामार्गाच्या मोजणी आणि सर्व्हेक्षणासाठी शासकीय अधिकारी व भूमी अभिलेख प्रशासनाचे पथक येणार असल्याची माहिती समोर आली होती. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाने अत्यंत गुप्तपणे आणि वेगाने हालचाली करत गुरुवारी पहाटेच मोठी प्रतिबंधात्मक कारवाई केली.
पहाटेच्या सुमारास शक्तीपीठ विरोधी समितीचे प्रमुख नेते के. के. पाटील यांच्या निवासस्थानी पोलीस फौजफाटा दाखल झाला आणि त्यांना घरातूनच ताब्यात घेण्यात आले. या अचानक झालेल्या कारवाईमुळे निमगावसह संपूर्ण माळशिरस तालुक्यात खळबळ उडाली असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शक्तीपीठ महामार्गाच्या प्रस्तावित आराखड्याला तालुक्यातील अनेक गावांमधील बागायतदार आणि जिरायत शेतकऱ्यांचा कडाडून विरोध आहे. हा महामार्ग झाल्यास परिसरातील सुपीक शेती, पिढ्यानपिढ्या राहती घरे आणि शेतकऱ्यांच्या उपजीविकेची साधने बाधित होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत मोजणी होऊ न देण्याच्या भूमिकेत शेतकरी असून आरपारच्या आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.
प्रशासनाचे पथक गावात दाखल होणार असल्याची माहिती मिळताच परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थ विरोधासाठी सज्ज झाले होते. संभाव्य आंदोलनाची तीव्रता कमी करण्यासाठी पोलिसांनी आंदोलनाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांवर कारवाई केली. ताब्यात घेतलेल्या नेत्यांमध्ये शक्तीपीठ विरोधी समितीचे प्रमुख के. के. पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अजित बोरकर यांचा समावेश आहे.
कारवाईनंतर पोलिसांनी के. के. पाटील यांना माढा पोलीस ठाण्यात नेले, तर अजित बोरकर यांना अकलूज पोलीस ठाण्यात स्थानबद्ध करण्यात आले आहे.
आपल्या नेत्यांना पहाटेच ताब्यात घेतल्याची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरताच निमगावमधील ग्रामस्थ आणि शेतकरी आक्रमक झाले. या कारवाईच्या निषेधार्थ गावकऱ्यांनी आणि स्थानिक व्यापाऱ्यांनी तातडीची बैठक घेऊन निमगाव पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. गावातील सर्व दुकाने, व्यावसायिक आस्थापने आणि बाजारपेठा कडकडीत बंद ठेवण्यात आल्या.
लोकशाही मार्गाने सुरू असलेले शेतकरी आंदोलन दडपण्यासाठी प्रशासन आणि पोलीस बळाचा वापर केला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. नेत्यांना स्थानबद्ध केले तरी सर्व्हेक्षणाला होणारा विरोध कमी होणार नाही, असा इशारा देत शेतकऱ्यांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि अटकेचा निषेध नोंदविला.
दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी निमगावमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सर्व्हेक्षण प्रक्रियेकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button