महाराष्ट्रसामाजिक उपक्रम
सारथीने दिवाळी फराळ वाटप करत उजळविला एक दिवा तंबाखू व्यसनमुक्तीचा

शिव निर्णय/सोलापूर : दिपावली निमित्त समाज उपयोगी उपक्रम राबवण्यासाठी सर्व स्तरामधिल व्यक्ती, संस्था, संघटना आपापल्या परीने प्रयत्न करत असतात. दिवाळीच्यानिमित्ताने गरजवंतांची दिवाळी गोड व्हावी आणि त्यांच्या आयुष्यामधिल तंबाखू व्यसन कमी करण्यासाठी सारथी युथ फाऊंडेशनच्यावतीने गरजवंतांसोबत दिपावली व एक दिवा तंबाखू व्यसनमुक्तीचा हा उपक्रम हाती घेतला. गरजवंतांसोबत दिपावली साजरी करण्याचे सारथी युथ फाउंडेशनचे हे १५ वे वर्ष आहे.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सारथीने आपला मानस कायम ठेवत सोलापूर मधील कुष्ठरुग्ण वसाहत, वीटभट्टी कामगार, पालावर राहणाऱ्या व्यक्ती आणि ऊसतोड कामगारांना दिपावली फराळाचे वाटप करण्यात आले. कामगार कुटुंबात तंबाखू व्यसनमुक्ती जनजागृती व्हावी म्हणून सारथी कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थींनी रंगवलेल्या पणत्या एमआयडीसी भागामधील विविध कंपनी चालकांना, विविध क्षेत्रातील सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या मान्यवरांना भेट देऊन तंबाखू व्यसनमुक्तीची जनजागृती करण्यासाठी सहकार्य करण्याबाबत आवाहन करण्यात आले. कामगार वसाहतीतील कुटुंबामध्ये तंबाखू व्यसनमुक्ती जनजागृती करण्यासाठी घरासमोर रांगोळी काढून आमचा परिवार तंबाखूमुक्त परिवार असे नाव देऊन त्यासोबत फोटो काढण्याची स्पर्धा घेण्यात आली. अनेक कुटुंबांनी यामध्ये सहभाग नोंदविला.
गरजवंतांची दिवाळी गोड करण्यासोबत गरजवंतांच्या जीवनामध्ये एक दिवा – तंबाखू व्यसनमुक्तीचा उजळून व्यसनमुक्ती परिवार बनवण्यासाठी प्रयत्न सारथी युथ फाऊंडेशनने केला.
विविधस्तरावरील दात्यांनी सारथी युथ फाऊंडेशनच्या विनायक नगर येथील संकलन केंद्रापर्यंत फराळ पोहोचवण्याचे कार्य केले तर काही दात्यांनी आर्थिक स्वरूपात मदत केली. अशा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष लाभलेल्या हातांच्या माध्यमातून यंदाच्या वर्षी सारथीने गरजु २५० कुटुंबांपर्यंत फराळ पोहोचवण्याचे कार्य केले आहे.
या कार्यक्रमासाठी सारथीचे अध्यक्ष ॲड. जावेद नगारे, सचिव रामचंद्र वाघमारे, कोअर कमिटी सदस्य प्रसाद आतनुरकर, तुकाराम चाबुकस्वार, हनुमंत सलगर, भाग्यश्री चाबुकस्वार, स्वयंसेवक आदित्य वाघमारे, अजय इंगळे, स्नेहा येरगुंटला, कांचन सुरवसे, लक्ष्मी शिगरकंटी, स्नेहा तुरेराव, रक्षिता बळुरगी, भाग्यश्री शिगरकंटी, वालचंद समाजकार्य विभागातील विद्यार्थी अभिषेक नराल, ईश्वर गड्डम, ऐश्वर्या शावणे, श्रुती देवकर, सुयोग शेरे, ओंकार नाईकवाडे आदी व्यक्तिंनी उपक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत.