*नवरात्र उत्सव निमित्त उळे येथे श्रीकृष्ण–रुक्मिणी स्वयंवर पुराणकथा निरूपण व नामसंकीर्तन सोहळ्याचे आयोजन*
*नामसंकीर्तन सोहळ्याचे 70 वे वर्ष*
उळे, ता. दक्षिण सोलापूर : श्री संत तुकाराम महाराजांचे वंशज वै. श्रीगुरू सोपान काका महाराज देहूकर यांच्या कृपाशीर्वादाने व श्रीगुरू बापूसाहेब महाराज देहूकर यांच्या प्रेरणेने, तसेच विठ्ठलाच्या अखंड सेवेचा मार्ग दाखविणाऱ्या आजी वै. कडुबाई धोंडिबा शिंदे, पिताश्री वै. मारुती शिंदे, मातोश्री वै.रुक्मिणीबाई मारुती शिंदे यांच्या संतपरंपरेच्या आशीर्वादाने राजेंद्र मारुती शिंदे यांच्या घरी उळे येथे नवरात्र उत्सव निमित्त श्रीकृष्ण–रुक्मिणी स्वयंवर पुराणकथा निरूपण व नामसंकीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती राजेंद्र मारुती शिंदे यांनी दिली असून हे नामसंकीर्तन सोहळ्याचे 70 वे वर्ष आहे.
श्रीकृष्ण–रुक्मिणी स्वयंवर पुराणकथा निरूपण व नामसंकीर्तन सोहळा रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६ ते शनिवार, दि. २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. दररोज सकाळी ९ ते ११ या वेळेत रुक्मिणी स्वयंवर कथेचे निरूपण, तर रात्री ८ ते १० या वेळेत नामसंकीर्तन सोहळा होणार आहे.
या सोहळ्यात विविध कीर्तनकारांची कीर्तने आयोजित करण्यात आली असून, रविवार दि 11 रोजी दत्तात्रेय शिरसागर महाराज, सोमवार दि 12 रोजी दत्तात्रेय घायाळ महाराज, मंगळवार दि 13 गुरु कान्होबा महाराज देहूकर, बुधवार दि 14 गंगाधर घाटणेकर महाराज, गुरुवार दि 15 श्याम जोशी महाराज, शुक्रवार दि 16 धनंजय गुंड महाराज, शनिवार दि 17 मन्मथ बहिरमल महाराज, रविवार दि 18 प्रभुलिंग महाराज, सोमवार दि 19 मन्मथ महाराज यांची कीर्तन सेवेत भाविकांना श्रीकृष्ण भक्ती, संतविचार आणि नामस्मरणाचा लाभ घेता येणार आहे. मंगळवार, दि. २० ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते १० या वेळेत श्रीकृष्ण–रुक्मिणी स्वयंवर पुराणकथेची सांगता व विवाह सोहळा संपन्न होणार आहे. त्यानंतर सकाळी १० ते १२ या वेळेत प्रभुलिंग महाराज शिरसागर, उळेकर यांचे काल्याचे कीर्तन होणार असून नंतर कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
या धार्मिक सोहळ्याचे आयोजन शिंदे परिवार व श्रीगणेश उद्योग समूह, उळे यांच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रमासाठी श्री. गुरु देहूकर सांप्रदायिक भजनी मंडळ, उळे यांचे विशेष सहकार्य लाभनार आहे.
या सोहळ्यास पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी उपस्थित राहून श्रवणभक्तीचा व नामस्मरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ज्ञानेश्वर मारुती शिंदे व बाळासाहेब मारुती शिंदे यांनी शिंदे परिवाराच्या वतीने केले आहे.
स्थळ : श्री. राजेंद्र मारुती शिंदे यांचे स्वगृही, उळे, ता. दक्षिण सोलापूर.

