शेटफळ हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; पीडितांना संरक्षण व न्याय द्या- प्रा.बब्रूवाहन पोटभरे
जाती अंत संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाची जखमींची भेट; SIT चौकशीची मागणी

*शेटफळ हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; पीडितांना संरक्षण व न्याय द्या- प्रा. बब्रूवाहन पोटभरे*
*जाती अंत संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाची जखमींची भेट; SIT चौकशीची मागणी*
सोलापूर, : मोहोळ तालुक्यातील शेटफळ येथील भीमनगर परिसरात २४ सप्टेंबर रोजी घडलेल्या हिंसक घटनेची निष्पक्ष व पारदर्शक चौकशी करून पीडितांना तातडीने संरक्षण व न्याय द्यावा, अशी मागणी जाती अंत संघर्ष समिती, सोलापूर जिल्हा समितीच्या वतीने करण्यात आली.
ज्येष्ठ नेते प्रा. बब्रूवाहन पोटभरे यांच्या नेतृत्वाखाली समितीच्या शिष्टमंडळाने श्री छत्रपती शिवाजी महाराज शासकीय सर्वोपचार रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमी व पीडितांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांच्याशी संवाद साधून झालेल्या घटनेची माहिती घेत या हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला.
पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकार पक्षाला आवश्यक कायदेशीर मदत करण्यासाठी समितीच्या वतीने वकील उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही प्रा. पोटभरे यांनी दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन योग्य ती कारवाई करण्याबाबत मोहोळचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. पाटील यांच्याशी भ्रमणध्वनीवरून चर्चा करण्यात आली. तसेच जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन साद करण्यात आले.
शेटफळ येथील घटनेप्रकरणी ३७ नामनिर्देशित व्यक्तींसह सुमारे १०० जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याचे सांगण्यात येत असून, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसारही कारवाई करण्यात आल्याचे समितीने नमूद केले.
समितीने SITच्या देखरेखीखाली निष्पक्ष चौकशी, दोषींवर पुराव्यांच्या आधारे कठोर कारवाई, पीडितांना वैद्यकीय उपचार व नुकसानभरपाई, वस्तीमध्ये पुरेसे पोलीस संरक्षण, CCTV व मोबाईल व्हिडिओंसह सर्व पुरावे सुरक्षित ठेवणे आणि २३ सप्टेंबर रोजी पोलिसांना दिलेल्या तक्रारीवर झालेल्या कार्यवाहीची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
पूर्वसूचना मिळूनही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात कसूर झाल्याचे आढळल्यास संबंधितांची जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली. तसेच गावातील जातीय तणाव कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व संबंधित समाजांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन सामाजिक सलोखा राखण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, असे समितीने म्हटले आहे.
यावेळी शिष्टमंडळात दीपक निकंबे, अभिजित निकंबे, ॲड. अनिल वासम, युवा महासंघाचे राज्य सचिव दत्ता चव्हाण, नरसिंग म्हेत्रे, सनी आमाटी, पांडुरंग म्हेत्रे, प्रशांत विटे, मल्लेशम कारमपुरी प्रदीप मरेड्डी,
प्रेम माने,आशिष गोडबोले आदी उपस्थित होते.



