देश - विदेश

आषाढी यात्रेत दि.16 जुलैपासून 24 तास दर्शन

भाविकांना अत्याधुनिक दर्जाच्या सोयी-सुविधा गहिनीनाथ महाराज औसेकर

 

आषाढी यात्रेत दि.16 जुलैपासून 24 तास दर्शन

भाविकांना अत्याधुनिक दर्जाच्या सोयी-सुविधा
गहिनीनाथ महाराज औसेकर
पंढरपूर  :- सन 2026 मधील आषाढी एकादशी शनिवार, दि.25 जुलै रोजी साजरी होत असून पहाटे 2.20 वाजता राज्याचे मुख्यमंत्री तसेच मानाचे वारकरी यांच्या शुभहस्ते सपत्नीक श्रींची शासकीय महापूजा संपन्न होणार आहे. आषाढी यात्रा कालावधी दि.15 ते 29 जुलै असा असून, या कालावधीत श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिराशी संबंधित प्रथा, परंपरा व भाविकांना देण्यात येणाऱ्या विविध सोयी-सुविधांचा आढावा घेण्यात आला.
दि.16 जुलै रोजी श्रींचा पलंग काढून भाविकांसाठी 24 तास दर्शन व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
मंदिर समितीची सभा दि.26 मे रोजी दुपारी 1.30 वाजता भक्तनिवास येथे श्री औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेचे पालन करून ही सभा आयोजित करण्यात आली होती. सभेस शकुंतला नडगिरे, डॉ. दिनेशकुमार कदम, संभाजी शिंदे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख (जळगांवकर), ॲड. माधवी निगडे, ह.भ.प. प्रकाश जवंजाळ, ह.भ.प. शिवाजीराव मोरे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक प्रविणकुमार घम, लेखा अधिकारी मुकेश अनेचा, पुरातत्व विभागाचे विलास वाहणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्रीनिवास गुजरे, वास्तुविशारद तेजस्विनी आफळे, जतन-संवर्धन कामाचे ठेकेदार प्रतिनिधी तसेच मंदिर समितीचे सर्व खाते प्रमुख उपस्थित होते.
सभेमध्ये आषाढी यात्रा नियोजनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. त्यामध्ये शासकीय महापूजा, 24 तास दर्शन व्यवस्था, दर्शनरांग नियोजन, लाईव्ह दर्शन, सुरक्षा व्यवस्था, निवास व्यवस्था, स्वच्छता, पिण्याचे पाणी, अन्नछत्र तसेच इतर अनुषंगिक सोयी-सुविधांबाबत चर्चा करण्यात आली.
तसेच प्रतिवर्षीप्रमाणे “श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार” देण्याचे निश्चित करण्यात आले. जतन व संवर्धन कामांच्या आढाव्यामध्ये श्री महालक्ष्मी मंदिर व श्री व्यंकटेश मंदिर येथे मूर्ती प्राणप्रतिष्ठा करून माहे जुलैमध्ये भाविकांसाठी मंदिरे दर्शनास खुली करण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय मंदिराचे मूळ स्वरूप कायम राखण्यासाठी स्वतंत्र नियमावली तयार करण्याचेही ठरविण्यात आले.
सभेत मंदिर समितीच्या सन 2026-2027 च्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली. पर्यावरण संवर्धनासाठी महाराष्ट्रामध्ये राबविण्यात येणाऱ्या “जगद्गुरू अभंग गाथावन” व “श्री ज्ञानेश्वरी तपोवन” या अभियानांमध्ये श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीचा सहभाग नोंदविण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच मंदिर समितीच्या जमिनी जास्तीत जास्त 3 ते 5 वर्षांच्या कालावधीसाठी भाडेपट्ट्याने देण्याबाबत अधिनियमामध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव शासनास सादर करण्याचे ठरले.
याशिवाय भक्तनिवास येथील 5 बेड व 8 बेडच्या खोल्या वातानुकूलित करणे, 24 तास गरम पाणी उपलब्ध व्हावे यासाठी हिट पंप यंत्रणेचे अद्यावतीकरण करणे, तसेच पंढरपूर शहर व परिसरातील अधिकृत मठांमध्ये शौचालय बांधकाम करणे आदी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button