माळीनगरमध्ये कृषी दूतांचे आगमन; तीन महिने शेतकऱ्यांसाठी विविध कृषी उपक्रम राबविणार

माळीनगरमध्ये कृषी दूतांचे आगमन; तीन महिने शेतकऱ्यांसाठी विविध कृषी उपक्रम राबविणार
प्रतिनिधी | माळीनगर
महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत सदगुरू कृषी महाविद्यालय येथील कृषी दूतांचे ग्रामीण कृषी कार्यानुभव आणि कृषी औद्योगिक संलग्नता उपक्रम २०२६-२७ अंतर्गत माळशिरस तालुक्यातील माळीनगर येथे आगमन झाले. कृषी दूतांमध्ये चौधरी, प्रथमेश ढगे, ज्ञानेश्वर कुटे, आशुतोष पाटील, अथर्व रोडे, सौरभ वाळके आणि साई दीप यांचा समावेश आहे.
कृषी दूतांचे स्वागत गावच्या सरपंच अनुपमा अनिल एकतपुरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामीण कृषी कार्यानुभव हा कृषी पदवीच्या चतुर्थ वर्षातील महत्त्वाचा अभ्यासक्रम असून विद्यार्थ्यांना ग्रामीण जीवन, सामाजिक-आर्थिक परिस्थिती आणि शेतीशी संबंधित समस्यांची प्रत्यक्ष माहिती मिळावी हा या उपक्रमाचा उद्देश आहे. पुढील तीन महिने कृषी दूत गावामध्ये मुक्कामी राहून शेतकऱ्यांसाठी विविध कृषीविषयक कार्यक्रम राबविणार आहेत.
या कालावधीत कृषी दूत शेतकऱ्यांना हंगामानुसार पीक पद्धती, रासायनिक खतांचा योग्य वापर, कीटकनाशक फवारणी करताना घ्यावयाची काळजी, सेंद्रिय शेती, माती परीक्षण, पाणी व्यवस्थापन, कीड व रोग नियंत्रण तसेच पीक संरक्षण याविषयी शास्त्रीय माहिती देणार आहेत. तसेच विविध कृषी प्रात्यक्षिकांचे आयोजनही करण्यात येणार आहे.
सदर उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. बिटे, कार्यक्रम समन्वयक प्रा. सी. बी. माने, कार्यक्रम अधिकारी प्रा. व्ही. बी. शिंदे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व विषयतज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभत आहे.

