सोलापूर दि. 09 :आयुक्त तथा संचालक नगरपरिषद प्रशासन संचालनालय व जिल्हा सहआयुक्त नगरपरिषद प्रशासन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय नगरपरिषद,नगरपंचायत जिल्हा वार्षिक क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव 2024-25 चे अकलूज येथे दि. 10 ते 12 जानेवारी 2025 या कालावधीत आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा सह आयुक्त श्रीमती वीणा पवार यांनी दिली.
या महोत्सवात सोलापूर जिल्हयातील 17 नगरपरिषदा, नगरपंचायती व जिल्हा सहआयुक्त कार्यालय अशी एकूण 18 कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी सहभागी होऊन आपले क्रीडा तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील नैपुण्य दाखविणार आहेत. या महोत्सवाचे यंदाचे यजमानपद अकलूज नगरपरिषदेला मिळाले असून विजयसिंह मोहिते -पाटील क्रीडा संकुल ,अकलूज येथे शुक्रवार दि 10 जानेवारी 2025 रोजी सकाळी 9.00 वा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली व नगरपरिषद प्रशासन ,पुणे विभागाच्या सह आयुक्त श्रीमती पूनम मेहता यांच्याहस्ते तसेच प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत क्रीडा स्पर्धेच्या उदघाट्नाने महोत्सवाची सुरुवात होणार आहे.
सदर महोत्सवात बॅडमिंटन, रस्सीखेच, टेबल-टेनिस, बुद्धीबळ,गोळा फेक, थाळी फेक, लांब उडी, उंच उडी, कॅरम, धावणे,चालणे,रिले, क्रिकेट, कबड्डी, व्हॉलिबॉल व इतर मैदानी खेळ होणार आहेत.तसेच पाककला,रांगोळी, समुह नृत्य, गायन,वेशभूषा इत्यादी सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. सदरच्या स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी जिल्हासह आयुक्त श्रीमती वीणा पवार यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली जिल्हयातील सर्व नगरपरिषद यांचे मुख्याधिकारी व अधिकारी – कर्मचारी कामकाज पाहत आहेत.तसेच सांस्कृतिक कार्यक्रम व बक्षिस वितरण समारंभ स्मृतीभवन यशवंत नगर ,अकलूज येथे दिनांक 12 जानेवारी 2025 रोजी दु 12.00 वाजता होणार आहे. सदर कार्यक्रमास जिल्हा क्रीडा अधिकारी ,जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभणार आहे .तसेच सदर कार्यक्रमास शंकरराव मोहिते महाविद्यालय ,अकलूज या कॉलेजचे प्राचार्य व पंच यांचे सहकार्य लाभणार आहे .
“Health is wealth” असा संदेश या क्रीडा व सांस्कृतीक महोत्सवात दिला जाणार आहे.कलागुणांना वाव मिळणे ,रोजच्या धकाधकी व तणावातून मुक्त होऊन छंद जोपासण्यासाठी अधिकारी ,कर्मचारी यांना प्रोत्साहित करणे व एक नवी उर्जा घेऊन नवनवीन सकारात्मक कामे करण्यासाठी सज्ज होण्यासाठी हा क्रीडा व सांस्कृतीक महोत्सव आयोजित केला असून, जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक महोत्सवाची नियोजनबध्द तयारी करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा सह आयुक्त श्रीमती वीणा पवार यांनी दिली.



More Stories
सोलापूरचे माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या गाडीचा अपघात
श्रीमती निर्मलाताई ठोकळ प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर अंतर्गत विध्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन
विधानसभा निवडणुकीत भाजपनेच केला शहाजी पाटलांचा गेम