सोलापूर जिल्ह्यांतील शासकीय वसतिगृहांसाठी विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया सुरु

सोलापूर : अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटकी जमात, इतर मागास प्रवर्ग, आर्थिक मागास प्रवर्गातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये तसेच त्यांच्या निवासी व भोजनासह इतर सोयी सुविधांची सोय व्हावी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सोलापूर जिल्ह्यात मुलांसाठी 9 व मुलींसाठी 7 वसतिगृह कार्यरत आहेत. या वसतीगृहातील रिक्त जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून, इच्छुक विद्यार्थ्यांनी अर्ज करावा असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त नागनाथ चौगुले यांनी केले आहे.
जिल्ह्यात सोलापूर, अक्कलकोट, पंढरपूर, बार्शी, माढा, अकलूज व करमाळा या ठिकाणी मुलांसाठी तसेच सोलापूर, अक्कलकोट, मोहोळ, पंढरपूर, बार्शी, कुर्डूवाडी व माळशिरस या ठिकाणी मुलींसाठी शासकीय वस्तीगृह कार्यरत आहेत. या वस्तीगृहात ताजे व सकस आहार, पिण्याचे शुद्ध पाणी, प्रशस्त अशी वातानुकुलीत संगणक कक्ष, अभ्यासिका, ई-लायब्ररी व अंतर्गत जिम, सुसज्य इमारत व स्वच्छ आणि नीटनेटक्या खोल्या यांसह अन्य सुविधा पुरवल्या जातात. कोणताही विद्यार्थी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती, भटकी जमात, इतर मागासवर्ग, आर्थिक मागासवर्ग व प्रतिकूल परिस्थितीमुळे शिक्षणापासून दूर न राहता जिद्द व चिकाटीने पुढे जावा हा या मागचा उद्देश आहे.
वसतिगृहातील प्रवेशित विद्यार्थ्यांना सर्व शैक्षणिक सोयी-सुविधा बरोबर, सीसीटीव्ही कॅमेरा सुरक्षा, स्पर्धा परीक्षा तयारी करण्यासाठी प्रोत्साहन, अवांतर वाचन साहित्य, क्रीडा साहित्य, त्याचबरोबर दर महिन्याला तालुका स्तरावर 500 रुपये व जिल्हा स्तरावर 600 रुपये निर्वाहभत्ता म्हणून दिला जातो.
इयत्ता 8 वी पासून पुढे प्रत्येक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांने व त्यांच्या पालकांनी संबंधित वसतिगृहाचे गृहपाल, व सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सात रस्ता, सोलापूर येथे दिनांक ३० जून २०२४ पर्यंत संपर्क साधून अधिकची माहिती घ्यावी. तसेच जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहनही समाज कल्याणचे सहायक आयुक्त नागनाथ चौगुले यांनी केले आहे.