क्राईम

सोलापूर जिल्हात धाब्यांवर दारू पिण्याची व्यवस्था करणाऱ्यावर धाडसत्र सुरुच

शिव निर्णय /सोलापूर : मंगळवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी सोलापूर जिल्ह्यात धाब्यांवर टाकलेल्या धाडीत 4 धाबा चालकांसह आठ  मद्यपी ग्राहकांना अटक केली असून बुधवारी न्यायालयाने 1 लाख बारा  हजारांचा दंड ठोठावला आहे.
सविस्तर वृत्त असे की, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हातभट्टी दारु, गोवा राज्यातील विदेशी दारु, अवैध देशी विदेशी दारु इ. विरुद्ध सातत्याने कारवाई केली जात असून जिल्हाभरात मंगळवारी (ता. 28 नोव्हेंबर) रोजी धाब्यांविरुद्ध राबविलेल्या विशेष मोहिमेत विभागाकडून चार गुन्हे नोंदविण्यात आले. या मोहिमे अंतर्गत निरिक्षक पंढरपूर किरण बिरादार यांच्या पथकाने सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास पेनूर (ता. मोहोळ) येथील होटेल रॉयल या ठिकाणी टाकलेल्या छाप्यात धाबा मालक युवराज नागनाथ कांबळे याच्यासह ग्राहक गणेश संजय त्रिंबके व काल्कु डोला कुर्मी यांना ताब्यात घेतले. बुधवारी आरोपींना मोहोळ कोर्टात हजर केला असता मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री महाळणकर यांनी धाबा मालकास पंचवीस हजार व ग्राहकास प्रत्येकी एक हजार दंड ठोठावला. दुय्यम निरिक्षक अकलूज राजेंद्र वाकडे यांच्या पथकाने माळशिरस-वेळापूर रोडवरील खुडूस येथील होटेल निसर्ग या धाब्यावरुन मालक सचिन हनुमंत कांबळे व मद्यपी ग्राहक सागर रमेश पिसे, देविदास श्रीमंत ठवरे व रामदास भगवान चव्हाण यांना अटक केली. सदर गुन्ह्यात  मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी माळशिरस श्री न्याहरकर यांनी धाबा मालकास पंचवीस हजार व ग्राहकास प्रत्येकी एक हजार दंड ठोठावला. दुय्यम निरिक्षक अक्षय भरते यांच्या पथकाने कुंभारी (ता. दक्षिण सोलापूर) येथील होटेल झंकार येथे धाड टाकली असता धाबा मालक रामू दत्तात्रय कोळी व मद्यपी ग्राहक सोमनाथ दत्ता कोळी यांना ताब्यात घेऊन बुधवारी मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी अक्कलकोट श्री बाळासाहेब गायकवाड यांचेसमक्ष हजर केले असता धाबा मालकास पंचवीस हजार व ग्राहकास एक हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. तसेच एका अन्य कारवाईत निरिक्षक सदानंद मस्करे यांनी विडीघरकुल कुंभारी परिसरात होटेल गौरी या ठिकाणी छापा टाकून होटेल मालक ओंकार धोंडिबा अंजिखाने व मद्यपी ग्राहक रोहित राजेंद्र मत्ते व श्रीकांत विष्णु रापोल यांना ताब्यात घेतले.  गुन्ह्याचे दोषारोपपत्र बुधवारी मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी दारूबंदी न्यायालय श्रीमती नम्रता बिरादार यांचे न्यायालयात सादर केले असता हॉटेल चालकास प्रत्येकी 25 हजार रुपये दंड व मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी तीन हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. या चारही कारवाईत मा. न्यायालयांनी एकूण एक लाख बारा हजारांचा दंड आरोपींकडून शासनजमा करुन घेतला आहे.
 ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली उप अधीक्षक गुणाजी क्षीरसागर, निरिक्षक सदानंद मस्करे, संदिप कदम, किरण बिरादार, दुय्यम निरीक्षक राजेंद्र वाकडे, अक्षय भरते, रोहिनी गुरव, कैलास छत्रे, विनायक जगताप, सहायक दुय्यम निरिक्षक गजानन होळकर, आवेज शेख, जीवन मुंढे, जवान इस्माईल गोडीकट, अनिल पांढरे, प्रशांत इंगोले, विकास वडमिले, प्रकाश सावंत, विजयकुमार शेळके, तानाजी जाधव, गजानन जाधव, वाहनचालक रशिद शेख, मारुती जडगे व दीपक वाघमारे यांच्या पथकाने पार पाडली.
आठ महिन्यातील कारवाई
राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून  “ग्राहकांना दारू पिण्याची व्यवस्था उपलब्ध करणाऱ्या” 38 धाब्यांवर कारवाई करण्यात आली असून 38 धाबा मालक व 111 मद्यपी ग्राहक असे एकूण 149 जणांवर कारवाई करण्यात आलेली आहे. या कारवाईत मा. न्यायालयाने धाबा चालकांना प्रत्येकी 25 हजार रुपये दंड व मद्यपी ग्राहकांना रुपये 500 ते 3000 पर्यंतचा वेगवेगळ्या प्रकरणात दंड असा एकूण अकरा लाख 99  हजार रुपये दंड ठोठावला आहे.
आवाहन
ढाब्यांवर दारु विक्री करणे किंवा ग्राहकांना दारु पिण्याची व्यवस्था उपलब्ध करुन देणे तसेच त्याठिकाणी बसून दारु पिणे महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा आहे. याचे उल्लंघन करणा-या धाब्यांची या विभागाकडून सातत्याने तपासणी सुरु असून याचे उल्लंघन करणा-या ढाबा चालक व ग्राहकांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल, असा  इशारा राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक नितीन धार्मिक यांनी  दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button