मोहोळच्या नागनाथ विद्यालयाच्या मुलींची व्हॉलीबॉल स्पर्धेत गरुडझेप ; राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

मोहोळच्या नागनाथ विद्यालयाच्या मुलींची व्हॉलीबॉल स्पर्धेत गरुडझेप; राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
शिव निर्णय/मोहोळ : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य अंतर्गत आयोजित विभागीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत मोहोळ येथील नागनाथ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी करत विद्यालयाच्या व तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या स्पर्धेत संघाने चमकदार यश मिळवत थेट राज्यस्तरीय स्पर्धेत धडक मारली आहे.
या स्पर्धेतील १७ वर्षांखालील मुलींच्या गटात नागनाथ विद्यालयाच्या संघाने प्रतिस्पर्ध्यांवर मात करत दिमाखात अजिंक्यपद (विजेतेपद) पटकावले. तर १९ वर्षांखालील मुलींच्या गटात संघाने अंतिम फेरीपर्यंत झुंजार खेळ करत उपविजेतेपद मिळवले. दोन्ही गटांतील या खेळाडूंची त्यांच्या वैयक्तिक व सांघिक उत्कृष्ट खेळाच्या जोरावर राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
विद्यार्थिनींच्या या ऐतिहासिक आणि घवघवीत यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक आबासाहेब पंढरीनाथ गावडे, संभाजी चव्हाण, विद्यालयाचे प्राचार्य, क्रीडा शिक्षक, मार्गदर्शक आणि मोहोळ तालुक्यातील नागरिकांकडून खेळाडू मुलींचे व त्यांच्या मार्गदर्शकांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.


