सोलापूर

महानगरपालिकेच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका नागरिकांना

महानगरपालिकेच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका नागरिकांना
सोलापूर :
सोलापूर शहरात सुरू असलेल्या सिमेंट रस्त्यांच्या कामांबाबत महानगरपालिकेचा नियोजनशून्य कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. रस्त्यांची कामे ४० ते ६० टक्के पूर्ण झाल्यानंतर आता महापालिकेला भूमिगत पाणीपुरवठा, ड्रेनेज, वीज, गॅस आणि इतर युटिलिटी सेवांचा आढावा घेण्याची आठवण झाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी सुरू असलेली रस्त्यांची कामे थांबण्याच्या मार्गावर असून त्याचा थेट फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.
महापालिकेने नुकतीच “खड्डेमुक्त रस्त्यांसाठी मास्टर प्लॅन” आणि विविध विभागांची संयुक्त आढावा बैठक घेत नागरिकांचा त्रास कमी करण्याचे आश्वासन दिले. मात्र, ही बैठक रस्त्यांची कामे सुरू होण्यापूर्वी व्हायला हवी होती, अशी तीव्र प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
काम सुरू करण्यापूर्वी संबंधित विभागांमध्ये समन्वय साधून भूमिगत सुविधांची पूर्तता केली असती, तर आज तयार होत असलेले रस्ते पुन्हा खोदण्याची वेळ आली नसती. आता रस्त्यांच्या कामात व्यत्यय निर्माण होण्याची शक्यता वाढली असून कामांचा कालावधी लांबणार आहे. परिणामी धूळ, चिखल, वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका आणि व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान यासारख्या समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.
यासंदर्भात दिलेल्या निवेदनात महानगरपालिकेच्या नियोजनशून्य आणि विस्कळीत कारभारावर जोरदार ताशेरे ओढण्यात आले आहेत. “काम सुरू करण्यापूर्वी सर्व विभागांची बैठक घेऊन पाणी, ड्रेनेज, वीज, गॅस आणि इतर भूमिगत सुविधांची पूर्तता करणे अपेक्षित होते. मात्र आधी रस्ते सुरू केले आणि आता आढावा बैठका घेतल्या जात आहेत. हे प्रशासनाचे अपयश असून त्याची शिक्षा नागरिकांना भोगावी लागत आहे,” असा आरोप करण्यात आला आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, “महापालिकेच्या नियोजनाच्या अभावामुळे कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. घोषणांपेक्षा योग्य नियोजन आणि वेळेत कामे पूर्ण करणे महत्त्वाचे आहे. अन्यथा नागरिकांचा संयम सुटल्यास तीव्र जनआंदोलन उभारले जाईल.”
शहरातील रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करून, भविष्यात कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी सर्व विभागांचा समन्वय साधूनच नियोजन करावे, अशी जोरदार मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button