महाराष्ट्रात CET 2026 परीक्षा सुरळीत पार

महाराष्ट्रात CET 2026 परीक्षा सुरळीत पार
राज्यभरातील ५.२ लाख विद्यार्थ्यांचा सहभाग; कडक सुरक्षा व्यवस्थेमुळे गैरप्रकारांना पूर्ण आळा
मुंबई / सोलापूर : महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (CET) 2026 यंदा अत्यंत शिस्तबद्ध, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने यशस्वीरीत्या पार पडली. राज्यभरातील विविध परीक्षा केंद्रांवर सुमारे ५.२ लाख विद्यार्थ्यांनी CET परीक्षा दिली. जवळपास दोन महिने चाललेल्या या संपूर्ण परीक्षा प्रक्रियेत कोणताही मोठा गैरप्रकार घडला नसल्याने प्रशासनाने समाधान व्यक्त केले आहे.
विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यापूर्वी डोअर मेटल डिटेक्टर, हँड मेटल डिटेक्टरद्वारे तपासणी करण्यात आली. तसेच बायोमेट्रिक रजिस्ट्रेशन, फेस रजिस्ट्रेशन आणि थंब रजिस्ट्रेशन अशा आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची ओळख पडताळण्यात आली. सर्व तपासण्या पूर्ण झाल्यानंतरच विद्यार्थ्यांना संगणक लॅबमध्ये प्रवेश देण्यात आला.
राज्यातील सर्व परीक्षा केंद्रांवर सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यात आली होती. प्रत्येक पर्यवेक्षकाच्या गळ्यात बॉडी कॅम लावण्यात आला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांवर सतत बारकाईने लक्ष ठेवणे शक्य झाले. या व्यवस्थेमुळे कॉपी किंवा इतर कोणत्याही गैरप्रकारांना पूर्णतः आळा बसला.
यंदा विद्यार्थ्यांना दोन संधी उपलब्ध करून देण्यात आल्याने परीक्षा कालावधी वाढला होता. तरीही प्रशासनाचे काटेकोर नियोजन, तांत्रिक यंत्रणेची तत्परता आणि केंद्रांवरील समन्वयामुळे परीक्षा शांततेत आणि सुरळीत पार पडली.
सोलापूरमधील शासकीय तंत्रनिकेतन परीक्षा केंद्रावरही परीक्षा यशस्वीरीत्या पूर्ण झाली. “विद्यार्थ्यांना सुरक्षित, पारदर्शक आणि तणावरहित वातावरणात परीक्षा देता यावी यासाठी सर्व यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली होती,” अशी माहिती CET Admin शाहाजी अंकुश कांबळे, शासकीय तंत्रनिकेतन सोलापूर यांनी दिली.


