मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या गाडीचा मुंबई पुणे एक्सप्रेस वर भीषण अपघात

मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या गाडीचा मुंबई पुणे एक्सप्रेस वर भीषण अपघात
पुणे : राज ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि पंढरपूरातील मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांच्या गाडीला मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात झाला असून, या दुर्घटनेत त्यांच्या छातीला व पायाला गंभीर दुखापत झाली आहे. सध्या त्यांच्यावर पुण्यातील हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिलीप धोत्रे हे खासगी कामानिमित्त मुंबईहून पुण्याच्या दिशेने आपल्या वाहनाने प्रवास करत होते. पहाटेच्या सुमारास मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर समोरून येणाऱ्या एका वाहनाने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की गाडीचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. अपघातानंतर घटनास्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेनंतर स्थानिक मदतकार्य आणि महामार्ग पोलिसांच्या मदतीने दिलीप धोत्रे यांना तातडीने पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांची विशेष टीम त्यांच्यावर उपचार करत असल्याचे सांगितले.
दरम्यान, हा अपघात नेमका कशामुळे झाला याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असला तरी पोलिसांकडून विविध शक्यतांचा तपास सुरू आहे. अपघातस्थळावरील परिस्थिती, वाहनाचा वेग तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासाची दिशा निश्चित केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दिलीप धोत्रे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापनेपासून राज ठाकरे यांच्यासोबत सक्रिय राहिले आहेत. मनसेच्या स्थापनेनंतर सोलापूर जिल्ह्यातून सर्वप्रथम साथ देणाऱ्या प्रमुख शिलेदारांमध्ये त्यांचा समावेश केला जातो. जिल्हा संघटक, शॅडो सहकारमंत्री आणि प्रदेश सरचिटणीस अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी प्रभावीपणे सांभाळल्या आहेत.
या घटनेची माहिती समोर येताच पंढरपूरसह सोलापूर जिल्ह्यातील मनसे कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी समर्थकांकडून प्रार्थना करण्यात येत आहे. राजकीय वर्तुळातही या अपघाताची मोठी चर्चा सुरू असून, अनेक नेते व कार्यकर्ते त्यांच्या प्रकृतीची माहिती घेत आहेत.



