सोलापूर
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शुक्रवारी वडाळा येथे वृक्षारोपण
भारत शिक्षण प्रसारक मंडळाचा उपक्रम

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शुक्रवारी वडाळा येथे वृक्षारोपण
भारत शिक्षण प्रसारक मंडळाचा उपक्रम
उत्तर सोलापूर : – जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून शुक्रवारी दि.5 रोजी वडाळा येथील भारत शिक्षण प्रसारक मंडळाच्या शिक्षण संकुलात वृक्षारोपण करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेच्या संचालिका, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सिनेट सदस्या, प्राचार्या डॉ.वैशाली जितेंद्र साठे यांनी दिली.
गेली चाळीस वर्षांपासून जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते व संस्थेचे मार्गदर्शक काकासाहेब साठे यांनी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचे व्रत जोपासले असून संस्थेच्या आवारात आतापर्यंत तीन हजार झाडे लावून ती जोपासली आहेत.तर वडाळा गावात, बार्शी सोलापूर रस्त्यावर,शेख फरीद बाबा दर्गा परिसरात हजारो झाडे लावली आहेत. पर्यावरण संवर्धनाचा त्यांचा हा उपक्रम त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू ठेवण्याचा निर्णय संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र साठे यांनी घेतला असल्याचे सांगून प्राचार्या डॉ.साठे म्हणाल्या,दरवर्षी किमान शंभर झाडे लावण्याचा उपक्रम काका साठे यांनी सातत्याने जोपासला आहे.त्यांच्या या उपक्रमामुळे वडाळा परिसरात हरितपट्टा निर्माण झाला आहे.
वाढते तापमान पाहिले तर मानवजातीपुढे मोठे संकट येत आहे.आता प्रत्येकाने किमान पाच झाडे लावून ती जोपासली तरच पर्यावरण संतुलित राखण्यासाठी मदत होणार आहे.भारत शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने दरवर्षी पावसाळ्यात वृक्षारोपण करण्यात येते.यंदाही पावसाळ्यात मोठ्याप्रमाणात वृक्षारोपण करण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून संस्थेच्या परिसरात प्रत्येक कर्मचाऱ्याचे एक झाड याप्रमाणे 90 झाडे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शुक्रवारी लावण्यात येणार आहेत.यामध्ये आंबा, चिकू,नारळ या झाडांचा समावेश आहे.शुक्रवारी सकाळी दहा वाजता वृक्षमित्र काकासाहेब साठे, संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र साठे, यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात येणार आहे.

