सोलापूर

भाजप उमेदवार राजेंद्र राऊत यांचा शक्तिप्रदर्शनासह उमेदवारी अर्ज दाखल

सोलापूर जिल्ह्यातील अनेक मातब्बरनेत्यांना राऊत यांनी टाकले मागे

भाजप उमेदवार राजेंद्र राऊत यांचा शक्तिप्रदर्शनासह उमेदवारी अर्ज दाखल

सोलापूर, : सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी सोमवारी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भाजप पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

अर्ज दाखल करण्यापूर्वी शहरात कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात एकत्र येत राजेंद्र राऊत यांना शुभेच्छा दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कार्यकर्त्यांनी गजबलले होते. कार्यकर्त्यांनी “राजेंद्र राऊत आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं” अशा घोषणा देत उमेदवाराला पाठिंबा दर्शविला.

यावेळी राजेंद्र राऊत यांनी पक्ष नेतृत्वाने आपल्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रश्नांना प्राधान्य देत विकासाभिमुख भूमिका मांडण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिक बळकटी देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
अर्ज दाखल करण्याच्या कार्यक्रमाला भाजपचे विविध पदाधिकारी, माजी व विद्यमान लोकप्रतिनिधी, नगरसेवक, पंचायत समिती सदस्य तसेच जिल्ह्यातील विविध भागांतील कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा अर्ज दाखल करण्याचा कार्यक्रम शक्तिप्रदर्शन ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली.

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजेंद्र राऊत यांच्या उमेदवारीमुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी निवडणुकीत विजयासाठी पक्षाने जोरदार तयारी सुरू केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सोलापूरच्या राजकीय घडामोडींमध्ये या उमेदवारी अर्ज दाखल कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्यावर विश्वास दाखवत उमेदवारी दिली असून, सोमवारी त्यांनी मोठ्या शक्तिप्रदर्शनात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या निर्णयामुळे सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या उमेदवारीबाबत विविध नावांची चर्चा रंगली होती. विशेषतः पंढरपूरचे प्रशांत परिचारक यांचे नाव आघाडीवर मानले जात होते. मात्र रविवारी रात्री भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने जाहीर केलेल्या अधिकृत यादीत राजेंद्र राऊत यांचे नाव घोषित होताच सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला. पक्षाने बार्शी तालुक्यातील प्रभावी नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वास टाकल्याचे या निर्णयातून स्पष्ट झाले.
सोमवारी सकाळी राऊत यांनी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, राज्यसभा खासदार प्रा. डॉ. ज्योती वाघमारे, आमदार विजयकुमार देशमुख यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. अर्ज दाखल करण्यापूर्वी शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी बार्शी येथे झालेल्या भगवंत महोत्सवादरम्यान राजेंद्र राऊत यांच्या नावाची राजकीय चर्चा सुरू झाली होती. त्यावेळी केवळ राजकीय अंदाज मानल्या गेलेल्या चर्चेला आता प्रत्यक्ष उमेदवारीचे रूप मिळाल्याने त्या चर्चांमध्ये तथ्य असल्याचे सिद्ध झाले आहे.
राजेंद्र राऊत यांना उमेदवारी मिळाल्याने बार्शीसह जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील भाजपच्या बळावर पक्षाने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असून, राऊत यांच्या उमेदवारीमुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांना नवी दिशा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगामी काळात या निवडणुकीभोवती जिल्ह्यातील राजकारण अधिकच तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button