जनगणना अंतर्गत घरगणना / घरयादी कामाचा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आढावा

सोलापूर : सह संचालक, जनगणना कार्य निर्देशालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई रमेश भोसले तसेच जिल्हा समन्वय अधिकारी अजित भांड यांनी सोलापूर महानगरपालिका येथे भेट देऊन जनगणना अंतर्गत सुरू असलेल्या घरगणना / घरयादी कामाचा आढावा घेतला.
यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे व सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित यांच्या हस्ते रमेश भोसले व अजित भांड यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांसमवेत जनगणना कार्याचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
यानंतर सह संचालक रमेश भोसले यांनी सोलापूर महानगरपालिका हद्दीतील सर्व चार्ज क्रमांक १ ते ८ मधील प्रगणक व पर्यवेक्षक यांच्या कामकाजाची प्रत्यक्ष क्षेत्रीय पाहणी केली. घरगणना व घरयादी नोंदणी प्रक्रियेची माहिती घेऊन त्यांनी कामाच्या अंमलबजावणीची तपासणी केली.
पाहणीदरम्यान त्यांनी प्रगणक व पर्यवेक्षकांशी संवाद साधून जनगणना कार्य अधिक अचूक, प्रभावी व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी आवश्यक सूचना दिल्या. नागरिकांकडून माहिती संकलन करताना शासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे तसेच माहिती नोंदणीमध्ये कोणतीही त्रुटी राहू नये, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
जनगणना हे देशाच्या नियोजन आणि विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे कार्य असून प्रत्येक घराची अचूक माहिती संकलित होणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. तसेच सोलापूर महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या घरगणना व घरयादी कामाबाबत समाधान व्यक्त करून संबंधित अधिकारी, प्रगणक व पर्यवेक्षक यांच्या कार्याचे कौतुक केले.
या प्रसंगी सहाय्यक कर संकलन व कर प्रमुख ओमप्रकाश वाघमारे तसेच जनगणना मुख्य कार्यालयातील संदीप भोसले व . आशिष घुले उपस्थित होते.

