
शनैश्वर जयंती निमित्त शनीशिराळ येथे 30 हजार भाविकांनी घेतले दर्शन..
बेंबळे : सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर टेंभुर्णी पासून पुढे पाच कि.मी. अंतरावर प्रतिशनी शिंगणापूर म्हणून मागील काही वर्षापासून प्रसिद्धीस आलेल्या शनिशिराळ येथे शनिवार दिनांक 16 मे रोजी शनेश्वर जयंती आणि शनी अमावस्या या एकत्रित विशेष योगायोगाच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त पहाटे मूर्तीस अभिषेक व पूजा करण्यात आली. दुपारी बारा वाजता शनैश्वरास रसाभिषेक, तैलाभिषेक व जलाभिषेक करून महाआरती करण्यात आली. सकाळपासून या जागृत देवस्थान ठिकाणी सर्व थरातील हजारो भाविकांची गर्दी दिसून येत होती. भाविकांनी तैलाभिषेक, दर्शन, पूजा व प्रसादाचा लाभ घेतला. पुणे येथील व्यंकटेश बालाजीचे सेवाधारी ‘व्यंकीज ग्रुप ‘ यांच्यातर्फे या ठिकाणी श्री वेंकटेश बालाजी देवस्थानचे नऊ हजार लाडू भाविकासाठी प्रसाद म्हणून अर्पण करण्यात आले होते तर येथील ट्रस्टच्या वतीने एक क्विंटल पेढे भाविकांना दिवसभर प्रसाद म्हणून देण्यात येत होते ,आजच्या दिवशी 28 ते 30 हजार भाविकांनी शनैश्वरा चे दर्शन घेतले असल्याचे देवस्थानचे मुख्य ट्रस्टी हिम्मत आण्णा तळेकर यांनी सांगितले.
‘तेल कमी खा…’ आव्हानास प्रतिसाद
शनि अमावस्या निमित्त देवस्थान ट्रस्टी प्रमुख हिम्मत अण्णा तळेकर यांचे तर्फे प्रत्येक वेळेस दोन क्विंटल साबुदाणा, एक क्विंटल बटाटे, एक क्विंटल शेंगदाणे व इतर लागणारे साहित्य वापरून किमान तीन क्विंटल तेलामध्ये साबुदाण्याचे वडे तळले जातात व दिवसभर भावीक भक्तांना प्रसाद म्हणून वाटले जातात, परंतु यावर्षी मात्र प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘तेल कमी खा’ आव्हानास प्रतिसाद देऊन पुण्याच्या व्यंकी बालाजी ग्रुप तर्फे दिलेले 9000 लाडू आणि ट्रस्टीच्या वतीने एक क्विंटल पेढे प्रसाद म्हणून भाविकांना देण्यात आले.



