March 5, 2026

ShivNirnay

हिंदवी बाण्याचे मराठी दैनिक

जिल्ह्यातील आजी माजी सैनिकांसाठी महसूल विभागामार्फत 10 ऑगस्ट रोजी सैनिक हो तुमच्यासाठी उपक्रम

सोलापूर:- जिल्ह्यातील सर्व वीर पत्नी, वीर माता, वीर पिता, माजी सैनिकांच्या विधवा पत्नी  व सेवारत सैनिक व त्यांचे अवलंबित यांना महसूल सप्ताहानिमित्त शनिवार दि.10 ऑगस्ट रोजी सर्व तालुक्यामध्ये आजी माजी सैनिकांसाठी महसूल दिवसाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यादिवशी तहसिलदार व महसूल कर्मचारी आजी माजी सैनिकांच्या महसूल संबंधित कामे करण्यासाठी तहसिल कार्यालयात उपस्थित राहणार आहेत. त्यामध्ये विविध कामांचा समावेश करण्यात आला आहे.

            राष्ट्रीय सुरक्षिततेल्या कामी सीमावर्ती भागामध्ये व सुरक्षिततेच्या दृष्टिने अन्य संवेदनशील भागांमध्ये तैनात असणारे संरक्षक दलातील अधिकारी, सैनिक यांना व त्यांच्या कुटुंबियांना आवश्यक असणारे, महसूल कार्यालयाकडून निर्गमित होणारे विविध दाखले, प्रमाणपत्रे मिळणेबाबत जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी किंवा समादेशक अधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेले अर्जावर कार्यवाही करण्यात येईल.

            संरक्षण दलात कार्यरत असताना शहीद झालेल्या कर्मचाऱ्यांना जमीन वाटप करण्याबाबत प्रलंबित असलेल्या अर्जावर कार्यवाही करण्यात येईल. तसेच संरक्षण दलातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी, कर्मचारी यांना घरासाठी, शेतीसाठी जमीन वाटपाबाबत प्रलंबित असलेली प्रकरणे तात्काळ निकाली काढण्यात येतील.

            जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयाशी समन्वय साधून संरक्षण दलातील कर्मचाऱ्यांचे महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित प्रश्न निकाली काढण्यात येतील असे तुंगार यांनी सांगितले आहे.

            प्रत्येक तहसिल कार्यालयात एक नोडल अधिकारी नेमण्यात आला आहे. शासनाच्या सदर उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी उत्तर व दक्षिण सोलापूर तहसीलमधील जास्तीत जास्त आजी माजी सैनिकांनी व त्यांच्या अवलंबितांनी सर्व कागदपत्रासह 2 प्रतित अर्जासह दिनांक 10 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11 वाजता उत्तर व दक्षिण सोलापूर तहसिल कार्यालयात उपस्थित रहावे.

तसेच इतर तालुक्यातील जास्तीत जास्त माजी सैनिकांनी व त्यांच्या अवलंबितांनी अडी-अडचणी बाबतची निवेदने सहपत्रासह दोन प्रतित संबंधित तहसिल कार्यालयात दिनांक 10 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत सादर करावे असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मिलिंद तुंगार यांनी केले आहे.