विधानसभा निवडणुकीत भाजपनेच केला शहाजी पाटलांचा गेम

शिव निर्णय /सोलापूर : गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत सांगोल्यातून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते शहाजीबापू पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. या निवडणुकीत भाजपनेच बापूंचा गेम केला का अशी चर्चा आता सुरू झाली आहे. याला कारण ठरले आहे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे एक जाहीर वक्तव्य..
सांगोल्यात शेकापचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या काही समर्थकांचा भाजप मध्ये प्रवेश झाला. हा प्रवेश होऊ नये यासाठी आमदार देशमुख यांनी प्रयत्न केल्याचे भाजपमध्ये प्रवेश केलेल्या अनेक नेत्यांनी जाहीरपणे सांगितले. हाच धागा पकडून पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी बोलताना काही लोकं म्हणतात मी किती दिवस पालकमंत्री असेल.. पण तुम्हाला आमदार करताना मी पालकमंत्री नव्हतो.
अशी त्यांनी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांना उद्देशून आठवण करून दिली तुम्ही आमदार होताना जयकुमार गोरे यांनी मदत केली म्हणून तुम्ही आमदार झाला तेव्हा मी पालकमंत्री नव्हतो. आमदार होताना माझी मदत चालली असे सांगत गोरे यांनी बाबासाहेब देशमुख यांना टोला लगावला होता. या सभेत बोलताना २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत सांगोल्याचा आमदार हा भाजपचाच असेल, अशी घोषणाही गोरे यांनी केली होती.
पालकमंत्री गोरे यांनी सांगोला मध्ये केलेल्या जाहीर वक्तव्यामुळे शिवसेना उमेदवार शहाजी बापू पाटील यांच्या पराभवात आपला सहभाग असल्याची अप्रत्यक्ष कबुली दिली आहे. याबाबत बोलताना माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी मात्र सावध प्रतिक्रिया देत निवडणुकीत मला भाजपने मदतच केली चुकून भावनेच्या भरात पालकमंत्री बोलून गेले असतील असे सांगत गोरे यांच्या वक्तव्याला सांभाळून घेण्याचा प्रयत्न केला.
शहाजीबापू पाटील यांनी या निवडणुकीत झालेला पराभव हा माझ्या आजारपणामुळे झाला मात्र २०२९ मध्ये सांगोल्यातून शिवसेनेचाच आमदार होईल असे ठणकावून सांगितले. पुढील विधानसभा निवडणुकीत सांगोला जागा शिवसेनेकडेच राहील असे सांगत पालकमंत्री गोरे यांचे वक्तव्य खोडून काढले
सांगोला विधानसभा निवडणुकीचा निकाल
सांगोला विधानसभा मतदारसंघाची निवडणूक तिरंगी झाली होती. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून शहाजीबापू पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे डॉ. बाबासाहेब देशमुख आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून दीपकआबा पाटील निवडणूक लढवत होते. शेकापच्या डॉ. बाबासाहेब देशमुख यांना ११६२५६ मतं मिळाली होती. तर, शहाजीबापू पाटील यांना ९०२७८ मतं मिळाली होती. ठाकरेंच्या शिवसेनेचे दीपकआबा साळुंकेपाटील यांना ५०९६२ मतं मिळालेली होती.
चौकट—सांगोला विधानसभा मतदारसंघ हा शिवसेना शिंदे गट लढवत असताना पालकमंत्री गोरे यांनी येथून २०२९चा आमदार भाजपचाच होईल असे सांगून या मतदारसंघावर दावा केला आहे.यामुळे महायुतीमधील अंतर्गत रस्सीखेचही समोर आली आहे.