होटेलचालकासह 2 मद्यपी ग्राहकांना अटक

सोलापूर : राज्य उत्पादन शुल्क सीमा तपासणी नाक्याच्या पथकाने गुरुवारी कुंभारी (ता.दक्षिण सोलापूर) येथील होटेल भाऊसाहेब धाब्यावर टाकलेल्या धाडीत मा. न्यायालयाने हॉटेल चालकासह दोन मद्यपी ग्राहकांना एकूण पस्तीस हजारांचा दंड ठोठावला.
सविस्तर वृत्त असे की, गुरुवारी (ता. 21 डिसेंबर) सायंकाळच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क सीमा तपासणी नाक्याच्या पथकाने सोलापूर ते कुंभारी रोडवर कुंभारी (ता. दक्षिण सोलापूर) येथील होटेल भाऊसाहेब ढाब्यावर छापा टाकला असता ढाबा चालक रविंद्र सिद्राम कांबळे, वय 37 वर्षे हा ग्राहकांना मद्य पिण्याची व्यवस्था उपलब्ध करुन देत असतांना आढळून आल्याने त्याचेसह 2 मद्यपी ग्राहक मरगु गंगाराम पुसाळकर व सुनिल हुचप्पा भाईमनी यांना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून 180 मिली क्षमतेच्या मॅकडॊवेल नंबर 1 व्हिस्कीच्या 2 बाटल्या व काचेचे ग्लास असा तिनशे वीस रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. गुन्ह्यातील तपास अधिकारी निरिक्षक गुलाब जाधव यांनी तपास पूर्ण करून आरोपपत्र न्यायालयात सादर केले असता मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, दारुबंदी न्यायालय श्रीमती नम्रता बिरादार यांनी हॉटेल चालकास रु. पंचवीस हजार द्रव्यदंड ठोठावला तसेच दंडाची रक्कम न भरल्यास सहा महिन्याची साधी कैदेची शिक्षा सुनावली. तसेच दोन्ही मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी पाचशे रुपये दंड, दंडाची रक्कम न भरल्यास तीस दिवसांच्या साधी कैदेची शिक्षा सुनावली असता तिन्ही आरोपींनी एकूण पस्तीस हजार दंडाची रक्कम मा. न्यायालयात जमा केली.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक व उपअधीक्षक गुणाजी क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली निरिक्षक गुलाब जाधव, दुय्यम निरीक्षक मानसी वाघ, सचिन गुठे, सहायक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण, जवान योगीराज तोग्गी, वसंत राठोड, आनंदराव दशवंत व अमित गायकवाड यांच्या पथकाने पार पाडली.
*आवाहन*
नाताळ सण व नविन वर्षाच्या पार्श्वभूमीवर या विभागाकडून सहा पथके नेमण्यात आली असून परराज्यातील दारुच्या अवैध वाहतूकीवर करडी नजर ठेवण्यात येत आहे. तसेच ढाबा / होटेलच्या अचानकपणे तपासण्या करण्यात येत आहेत. ढाब्यावर दारु विक्री करणे तसेच त्याठिकाणी बसून दारु पिणे कायद्याने गुन्हा आहे. कायद्याचे उल्लंघन करणा-यांविरुद्ध यापुढेही अशाच प्रकारे कडक कारवाया केल्या जातील. ज्या होटेल्सना न्यू ईअर पार्ट्यांचे आयोजन करावयाचे आहे त्यांनी त्याठिकाणी मद्याचे वितरण करण्यासाठी या विभागाकडून रीतसर वनडे क्लब लायसंस घ्यावे, अन्यथा अशा होटेल्सचे मालक व आयोजकांविरुद्धही कारवाई करण्यात येईल- नितिन धार्मिक, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, सोलापूर