पुणे

स्थानीक स्वराज्य संस्थांसाठी मोहिते पाटलांचा हुकमी डाव निर्णयक ठरणार का?

 

शिव निर्णय /सोलापूर : लोकसभा निवडणुकीवेळी धैर्यशील मोहिते पाटील यांनी तुतारी हाती घ्यावी, यासाठी आग्रही भूमिका घेणारे जयसिंह मोहिते पाटील यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यासोबत असल्याचे सांगून पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे रणजितसिंह यांना पक्षातून निलंबित करावे, यासाठी भाजपमधील एक गट आक्रमक आहे. मात्र, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत चांगले यश पाठीशी उभे करून अडचणीत सापडलेले रणजितसिंहांसाठी त्यांचे काका जयसिंह मोहिते पाटील हे मैदानात उतरल्याचे दिसून येत आहे.जयसिंह मोहिते पाटील यांनी रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या पाठीशी उभं राहणार असल्याचे सांगून सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडवली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दोघे एकत्र काम करणार आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या वेळी माढा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील हे भाजपकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. मात्र, भाजपने त्यांना तिकिट नाकारून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना तिकिट दिले होते. त्यामुळे मोहिते पाटील यांनी बंड करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाण्याचा निर्णय घेतला होता. विशेषतः मोहिते पाटील घराण्याचे राजकीय रणनीतीकार म्हणून ओळखले जाणारे जयसिंह मोहिते पाटील हे विशेष आग्रही होते. संपूर्ण मोहिते पाटील कुटुंबीय त्या वेळी धैर्यशील यांच्यासाठी एकटवले होते.

भाजपचे वरिष्ठ नेते शिवरत्न बंगल्यावर येऊनही जयसिंह मोहिते पाटील यांनी माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील निवडणूक लढवणारच, या भूमिकेवर कायम राहिले होते. त्या वेळी रणजितसिंह मोहिते पाटील हे मात्र भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रचारापासून दूर होते. मात्र, त्यांच्यावर पक्षाच्या विरोधात भूमिका घेतल्याचा आरोप करण्यात आला होता.

माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांनी रणजितसिंह मोहिते पाटील यांनी निवडणुकीत पक्षविरोधी भूमिका घेतल्याने त्यांना पक्षातून निलंबित करण्यात यावे, अशी मागणी पक्षश्रेष्ठींंकडे लावून धरली होती. त्यावरून रणजितसिंह मोहिते पाटील यांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आलेली आहे, त्यामुळे रणजितदादा हे भाजपमध्ये काहीसे अडचणीत असल्याचे मानले जात होते.

भाजपमध्ये अडचणीत असलेल्या आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचे स्थान मजबूत करण्यासाठी आता जयसिंह मोहिते पाटील यांनी भूमिका बदलल्याचे दिसून येते. लोकसभा निवडणुकीच्या वेळी धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पाठीशी उभे राहून एका पुतण्याला लोकसभेत पाठविण्यात महत्वाची भूमिका बजावणारे जयसिंह यांनी आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत रणजितसिंहांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.

सहकार महर्षी साखर कारखान्याच्या गाळप हंगामाच्या कार्यक्रमात बोलताना ‘लोकसभा निवडणुकीवेळी आम्ही धैर्यशील यांच्यासोबत होतो. आता जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत आम्ही रणजितसिंह यांच्यासोबत आहोत, असे जयसिंह मोहिते पाटील यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. त्यामुळे अडचणीतील पुतण्यासाठी काकाने आपली भूमिका पुन्हा बदलल्याचे दिसून येते.

जयसिंह मोहिते पाटील यांच्या भूमिकेमुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत माळशिरसमध्ये भाजपचे पयार्याने रणजितसिंह मोहिते पाटलांचे पारडे जड राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जयसिंहांच्या भूमिकेमुळे रणजितसिंहांचे भाजपमधील स्थान मजबूत होणार असल्याचे मानले जात आहे.

दरम्यान, श्रीपूर येथील पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्रमात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्यासोबत तब्बल दीड वर्षाने एकत्र आले होते, त्यामुळे मोहिते-पाटील यांनी भाजपशी जुळवून घेतल्याचे संकेत मिळाले होते. आताही जयसिंह मोहिते पाटील यांच्या भूमिकेमुळे मोहिते पाटील हे भाजपचे काम करणार असल्याचे मानले जात आहे.भाजपमधील अडचणीच्या काळात आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना काका जयसिंह मोहिते पाटील यांनी उघडपणे पाठिंबा दिला आहे. लोकसभा निवडणुकीत धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पाठीशी असलेले जयसिंह आता रणजितसिंहांच्या बाजूने उभे राहून राजकीय समीकरण बदलू शकतात. जयसिंहांच्या भूमिकेमुळे रणजितसिंहांचे भाजपमधील स्थान अधिक स्थिर होईल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button