सोलापूरमध्ये स्काऊटर-गाईडर यांचेसाठी प्राथमिक व प्रगत प्रशिक्षण शिबिराचे आयोजिन !
सोलापूर -महाराष्ट्र राज्य भारत स्काऊटस् आणि गाईडस् राज्य मुख्यालय, मुंबई व सोलापूर जिल्हा परिषद शिक्षण विभाग-प्राथमिक व माध्यमिक तसेच सोलापूर भारत स्काऊटस् आणि गाईडस् शहर जिल्हा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२७ नोव्हेंबर ते ०३ डिसेंबर २०२४ या कालावधीत ७ दिवसांचे शिक्षकांसाठी निवासी प्राथमिक व प्रगत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. बाळे, ता. उत्तर सोलापूर येथील ज. रा. चंडक प्रशाला येथे सात दिवसांचे हे निवासी प्रशिक्षण शिबिर होणार आहे. जिल्ह्यातील स्काऊट गाईड या विषयाचे नव्याने युनिट नोंदणी केलेल्या अप्रशिक्षित शिक्षक शिक्षिका यांचेसाठी प्राथमिक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन व प्राथमिक प्रशिक्षण पूर्ण केलेल्या आश्रम शाळा,इंग्लिश मिडियम स्कूल,जिल्हा परिषद शाळा ,खासगी प्राथमिक व माध्यमिक विभागातील शिक्षक -शिक्षिकांसाठी कब मास्टर, स्काऊट मास्टर,फ्लॉक लीडर व गाईड कॅप्टन यांचेसाठी प्रगत-ॲडव्हान्स प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले असल्याचे जिल्हा चिटणीस तथा माध्यमिक उप शिक्षणाधिकारी स्वाती हवेले यांनी सांगितले.सोलापूर जिल्हा संघटक स्काऊट श्रीधर मोरे व जिल्हा संघटक गाईड अनुसया सिरसाट यांनी जिल्ह्यातील स्काऊट गाईड शिक्षकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे! आपल्या शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनींना राज्य पुरस्कार, राज्यपाल पुरस्कार, राष्ट्रपती प्रमाणपत्र पुरस्कार, पंतप्रधान ढाल स्पर्धा, चतुर्थ चरण राज्य पुरस्कार व हिरक पंख राज्य पुरस्कार, राष्ट्रीय सुवर्ण बाण पुरस्कार नवी दिल्ली यासाठी शिक्षक- शिक्षिकांचे प्रगत प्रशिक्षण होणे आवश्यक आहे. आपल्या शाळेतील स्काऊट गाईड विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी व शाळेच्या नाव लौकिकासाठी सदर प्रशिक्षणात मार्गदर्शन केले जाणार आहे! या प्रशिक्षण शिबिरात जिल्हा मुख्य आयुक्त तथा प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख साहेब ,जिल्हा आयुक्त तथा माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप साहेब, सोलापूर जिल्हा प्रशिक्षण आयुक्त स्काऊट तथा कॅम्प डायरेक्टर शंकरराव यादव व सुलक्षणा लोखंडे जिल्हा प्रशिक्षण आयुक्त गाईड यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी आणि विद्यार्थींनींना शासनाने शालेय गणवेशासोबत स्काऊट गाईडचा गणवेश ही मोफत दिलेला असून त्यांची युनिट नोंदणी जिल्हा संस्थेकडे झालेली आहे, स्काऊट गाईडच्या तासिकेला कोणते उपक्रम व अभ्यासक्रम घ्यावा याविषयी सखोल मार्गदर्शन या प्रशिक्षण शिबिरातून होणार आहे तसेच या अगोदर ज्यांनी प्राथमिक प्रशिक्षण शिबीर पूर्ण केले आहे त्या स्काऊटर गाईडर यांचेसाठी प्रगत प्रशिक्षणाची संधी मिळणार आहे, प्रगत प्रशिक्षण राज्य स्तरावरून दिले जाते तथापि जिल्हा मुख्य आयुक्तांच्या मागणी नुसार सोलापूर येथे दुसरी संधी मिळाली आहे, प्रशिक्षण देण्यासाठी राज्य स्तरावरून मार्गदर्शक लाभणार आहेत, तरी सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा!