क्राईम
सोलापूरच्या एका इसमास 6 किलो गांजासह बार्शीत अटक, आरोपीवर गुन्हा दाखल..!
बार्शी : बार्शी शहरात व तालुक्यात अवैध धंद्यांचे प्रमाण वाढत असून बार्शी शहरातील उपळाई रोड येथे 6 किलो गांजासह आरोपीला अटक करण्यात आली आहे.
शहर पोलिसांनी बुधवारी रात्री 9 वा. सापळा रचून गांजा अमली पदार्थ विक्रीस आणलेल्या ऋत्विक मानतेश सोनेगार (वय 21 वर्षे राहणार मुस्लिम पाच्छा पेठ, सोलापूर) यास अटक करून गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, गांजा विकण्यासाठी एक इसम बार्शीमध्ये येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, शहरातील माढेश्वरी मंगल कार्यालय, उपळाई रोड येथे सदर आरोपी मोटर सायकलवरून आला असता, पोलिसांकडून त्याची अंगझडती घेण्यात आली. त्यावेळी, जवळील सायकलच्या टाकीवर चॉकलेटी रंगाची बॅग मिळून आली, ती उघडून पाहता त्यात प्लास्टिकच्या बॅगेत गुंडाळलेली व दोऱ्याने बांधलेली हिरवट काळपट उग्र वासाची पाने बिया आढळले.
ती वस्तू गांजा नावाचा अमली पदार्थ असल्याचे लक्षात आले, या अमली पदार्थाचे वजन 6269 ग्रॅम वजन आहे. पोलिसांनी आरोपीकडील गांजा आणि मोटरसायकल (45 हजार रुपये किमत) असा एकूण 1 लाख 7 हजार 690 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहेत. आरोपीवर एनडीपीएस ऍक्ट कलम 8 क 20 ब याप्रमाणे गुन्हाही दाखल झाला आहे.
दरम्यान, विभागीय पोलीस अधिकारी नालकुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे, अजित वरपे, अर्जुन गोसावी, पोलीस कॉन्स्टेबल पवार जाधव देशमुख साळवी यांनी कामगिरी बजावली. बार्शी शहरात सोलापूर येथील इसम गांजा विक्रीसाठी कोणाकडे आला? त्यांनी आत्तापर्यंत किती लोकांना बार्शीत गांजा विकला? बार्शी शहरात आणखी किती गांजा विक्री करणारे लोक आहेत याचा तपास बार्शी पोलिसांनी करावा अशी मागणी जनतेतून होत आहे. बार्शी शहरातील बऱ्याच ठिकाणी जसे की तुळजापूर रोड येथील मार्केट कमिटी जवळ बार्शी शहरातील भगवंताच्या पाठीमागे तसेच पंचायत समिती जवळील टाकी खाली व इतर विविध ठिकाणी अनेक गांजा उडणारे राजहंसपणे गांजा उडत असतात त्यांच्याकडे कुठून गांजा येतो यामागे बार्शीतील काही बड्या हस्तींचा हात आहे काय ?याचाही शोध पोलिसांना घ्यावा व संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी जनतेतून मागणी होत आहे. सदर कारवाईचे बार्शीतील सुज्ञ नागरिकाकडून बार्शी पोलिसांचे विशेष कौतुक व अभिनंदन केले जात आहे.