राजकारण
सकल मराठा व बहुजन समाजा तर्फे आणखी एक सातपुते मैदानात ?

धनंजय भोसले
हिंदू सकल मराठा, सकल बहुजन समाज व मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांची सोलापूर लोकसभा उमेदवारीसाठी बैठक संपन्न झाली. सदर बैठकीमध्ये हुन्नूर तालुका मंगळवेढा येथील शिक्षक कैलास सातपुते यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातून जनतेची सेवा करण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने उमेदवारी मिळावी असा प्रस्ताव त्यांनी मांडला. त्यामुळे सोलापूर मध्ये लोकसभेच्या रणांगणात भारतीय जनता पार्टी कडून माळशिरसचे आमदार राम सातपुते, काँग्रेसच्या आमदार प्रणितीताई शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाले असता सकल मराठा कडून कैलास सातपुते इच्छुक आहेत. त्यामुळे आणखीन एक सातपुते उतरलेची चर्चा सुरू झाली आहे.
सदर बैठकीमध्ये कैलास सातपुते म्हणाले की मनोज दादाच्या माध्यमातून मराठा समाजाच्या भावना लोकसभेमध्ये पाठविण्यासाठी मराठा समाजांना आरक्षण देण्यासाठी, उपेक्षित समाजातील स्त्रियांवरील अत्याचार थांबवण्यासाठी, अंगणवाडी सेविकांचा प्रश्न मांडण्यासाठी, शिक्षकांचा प्रश्न लोकसभेत मांडण्यासाठी, इतर समाजातील आरक्षण मिळवून देण्यासाठी मी सतत प्रयत्न करेन. सोलापूर जिल्ह्यामध्ये मराठा समाजाची ताकद मोठ्या प्रमाणात असून दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, मोहोळ, पंढरपूर, माळशिरस, अक्कलकोट या तालुक्यांमध्ये मराठा समाज मोठ्या प्रमाणात आहे. एक वर्षाच्या आत मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी जीवाची परवा न करता प्रयत्नशील राहील व आरक्षण मिळवून देईन असेही ते म्हणाले. यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्या बद्दल घोषणाही देण्यात आल्या. त्यामुळे सोलापूर लोकसभा निवडणुकी बहुरंगी होण्याची चिन्हे आता दिसत आहेत.
चौकट
कैलास सातपुते हे संत रोहिदास चर्मकार संघाचे प्रदेशाध्यक्ष असून शिक्षक संघटनेवर ही त्यांनी काम केले आहे. ते स्वतः पेशाने शिक्षणाशी संबंधित असल्याने शिक्षकांच्या भावना सांभाळण्याची काम त्यांनी मोठ्या प्रमाणावर केले आहे. सोलापूर मतदार संघातील मंगळवेढा बरोबर अनेक तालुक्यातही शिक्षकांमध्ये त्यांची मोठी क्रेझ आहे. ते समाजाच्या प्रत्येक घटकाशी निगडित आहेत. त्यांच्या उमेदवारीमुळे जरांगे पाटील समर्थकांचा एक खासदार नक्कीच वाढणार आहे असे जनतेतून बोलले जात आहे.
गोरगरीब जनतेच्या भावना लक्षात घेऊन सातपुते यांनी टेंभुर्णी येथे बालवाडी ते बारावी पर्यंत आर्थिक दृष्ट्या मागास इतर मागास सर्वांना मोफत शिक्षण मिळावे या उद्देशाने शिक्षण संस्था स्थापन केली या शिक्षक संस्थेत अनेक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.पुणे विभागाचे माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांना निवडून आणण्यासाठी कैलास सातपुते यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या उमेदवारीने मोहोळ मतदार संघात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रा. हरिचंद्र गाडेकर, ओझेवाडी, ता पंढरपूर.