सोलापूर

श्री सिद्धेश्वर महायात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी सर्वांनी परस्परात समन्वय ठेवावा – जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

सोलापूर, : सोलापूर शहरात दिनांक 1 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये होम मैदान येथे श्री सिद्धेश्वर महायात्रा (गड्डा यात्रा) भरते. तर दिनांक 12 ते 16 जानेवारी 2024 या कालावधीत अक्षता सोहळा सह अन्य धार्मिक विधी पार पाडले जातात. तरी ही सिद्धेश्वराची महायात्रा यशस्वी करण्यासाठी मंदिर समिती तसेच सर्व शासकीय यंत्रणांनी परस्परात योग्य समन्वय ठेवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.

  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित श्री सिद्धेश्वर महायात्रा आयोजनाच्या अनुषंगाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत जिल्हाधिकारी मार्गदर्शन करत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे, सोलापूर प्रांताधिकारी सदाशिव पडदूने, जिल्हा अन्नधान्य वितरण अधिकारी सुमित खाडे, तहसीलदार महसूल दत्तात्रय मोहोळे, तहसीलदार सैफान नदाफ, महापालिकेचे सिटी इंजिनियर श्री. चलवदी, मंदिर समितीची पंच कमिटी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढेले, विभागाचे अधिकारी यांच्यासह अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते.

     जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले की, श्री सिद्धेश्वर महायात्रा कालावधीत भाविकांना कोणताही त्रास होणार नाही या दृष्टीने संपूर्ण नियोजन करावे. मंदिर परिसर, होम मैदान व शहरात कोठेही अस्वच्छता राहणार नाही याचे नियोजन करावे. पोलीस विभागाने वाहतुकीचे व गर्दीचे नियंत्रण व्यवस्थितपणे करावे यात कोणत्याही प्रकारची त्रुटी राहणार नाही याची दक्षता घ्यावी. दिनांक 12 ते 16 जानेवारी या कालावधीत श्री सिद्धेश्वर यांचे अक्षता सोहळा व अन्य धार्मिक विधी पार पाडणार आहेत व याच कालावधीत गर्दी जास्त राहणार असल्याने पोलीस विभागाने बंदोबस्त चोखपणे ठेवावा असेही निर्देश त्यांनी दिले.

     संपूर्ण यात्रा कालावधी पोलीस विभाग व मंदिर समितीने पार्किंगची चोख व्यवस्था ठेवावी प्रदूषण नियंत्रण मंडळाने या परिसरात प्रदूषण प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात तसेच  प्रदूषण पातळीवर बारीक लक्ष ठेवावे. यात्रा कालावधीत व यात्रा झाल्यानंतर संपूर्ण परिसर स्वच्छ राहील याबाबत महानगरपालिका व मंदिर समितीने योग्य नियोजन करावे. होम मैदानावरील मनोरंजन नगरीबाबत तेथील स्टॉल व अन्य सोयी सुविधा पुरविण्याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी. भाविकाच्या संख्येप्रमाणे आरोग्य पथकाचे नियोजन करावे, अशा सूचना ही जिल्हाधिकारी आशीर्वादाने दिल्या.श्री सिद्धेश्वर महायात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी सर्वांनी परस्परात समन्वय ठेवावा - जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

    यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांनी संपूर्ण यात्रा कालावधी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या निर्देशाप्रमाणे मंदिर समिती व सर्व संबंधित विभागांनी कामकाज पार पाडावे अशा सूचना दिल्या. तर प्रांताधिकारी सदाशिव पडदूने यांनी यात्रा कालावधीत प्रत्येक शासकीय विभागाची तसेच मंदिर समितीच्या विविध जबाबदाऱ्या व त्यांनी करावयाची कार्यवाही याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच पंचकमिटी सदस्यांनी मंदिर समितीच्या वतीने मंदिर परिसरात भाविक यांच्यासाठी करण्यात येत असलेल्या सोयी सुविधांची माहिती दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button