राज्य उत्पादन शुल्क विभागाचे हातभट्ट्यांवर छापे

शिव निर्णय / सोलापूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाने शनिवारी मुळेगाव तांडा, सिताराम तांडा, बक्षीहिप्परगा (दक्षिण सोलापूर तालुका) , लक्ष्मी टाकळी ता. पंढरपूर व विझोरी (ता. माळशिरस) येथील हातभट्ट्यांवर धाडी टाकून अकरा गुन्ह्यात दोनशे पंच्याण्णव लिटर हातभट्टी दारू व सतरा हजार चारशे लिटर गुळमिश्रित रसायन व दोन दुचाकींसह चार लाख चौ-याण्णव हजारांच्या मुद्देमालासह सहा आरोपींना अटक केली आहे.
सविस्तर वृत्त असे की, सोलापूर राज्य उत्पादन शुल्क विभागाने 2 डिसेंबर शनिवारी पहाटेच्या सुमारास उपअधीक्षक गुणाजी क्षीरसागर यांच्या नेतृत्वात दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांडा, सिताराम तांडा, दोड्डी तांडा व बक्षीहिप्परगा येथील हातभट्टी ठिकाणांवर धाडी टाकल्या. या छापा कारवाईत एकूण सात गुन्हे नोंदविण्यात आले असून आरोपी नामे यशोदा काशिनाथ राठोड, वय 35 वर्षे, रा. सिताराम तांडा व संजय बाळू चव्हाण, वय 35 वर्षे, रा. सिताराम तांडा यांच्या ताब्यातून लोखंडी बॅरल व प्लास्टिक बॅरलमध्ये साठवून ठेवलेले एकूण चार हजार चारशे पन्नास लिटर एकूण लिटर गुळमिश्रित रसायन जप्त करुन जागीच नाश केले. मुळेगाव तांडा , सिताराम तांडा, बक्षीहिप्परगा व दोड्डी तांडा येथील वेगवेगळ्या हातभट्टी ठिकाणांवर धाडी टाकून पथकाने बारा हजार दोनशे पन्नास लिटर रसायन जप्त करुन जागीच नाश केले. पहाटेच्या सुमारास टाकलेल्या धाडी दरम्यान अंधाराचा फायदा घेऊन चार आरोपी पळून गेल्याने त्यांना फरार घोषित करण्यात आले असून त्यांचा शोध तपास अधिकारी करीत आहेत. एका अन्य कारवाईत निरीक्षक ब सदानंद मस्करे यांच्या पथकाने दर्गनहळ्ळी ते बोरामणी रोडवर एका इसमास मोटरसायकल क्रमांक TN 58 A 9597 दुचाकी वरून दोन रबरी ट्यूब मध्ये 160 लिटर हातभट्टी दारू वाहतूक करताना आढळून आल्याने पाठलाग केला असता आरोपी मोटरसायकल जागेवर टाकून फरार झाला. या गुन्ह्यात वाहनासह एकूण अठ्ठेचाळीस हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या धाडसत्रावेळी सात गुन्ह्यात एकूण एकशे साठ लिटर हातभट्टी दारू व सोळा हजार सातशे लिटर गुळमिश्रित रसायनासह साडे चार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, संचालक (अंमलबजावणी व दक्षता) सुनिल चव्हाण, विभागीय उपआयुक्त विजय चिंचाळकर, अधीक्षक नितिन धार्मिक यांच्या आदेशान्वये व उपअधीक्षक गुणाजी क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली निरिक्षक सदानंद मस्करे, सुनील कदम, गुलाब जाधव, दुय्यम निरिक्षक उषाकिरण मिसाळ, रोहिणी गुरव, सहायक दुय्यम निरिक्षक मुकेश चव्हाण, गजानन होळकर, अलीम शेख, जवान किरण खंदारे, अनिल पांढरे, अण्णा कर्चे , अशोक माळी, शोएब बेगमपुरे, चेतन व्हनगुंटी, वसंत राठोड, योगीराज तोग्गी, वाहनचालक रशिद शेख व दिपक वाघमारे यांनी पार पाडली.
तसेच पंढरपूर विभागाच्या दुय्यम निरिक्षक मयूरा खेत्री व जवान प्रकाश सावंत यांच्या पथकाने पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथील पारधी वस्तीवर धाड टाकून त्या ठिकाणाहून ललिता अनिल चव्हाण वय 51 वर्षे या महिलेच्या ताब्यातून 80 लिटर हातभट्टी दारू व अविंदा सुरेश पवार वय 52 वर्षे या महिलेच्या ताब्यातून सातशे लिटर रसायन व 45 लिटर हातभट्टी दारू असा एकूण 23 हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. तसेच निरीक्षक माळशिरस संदीप कदम यांच्या पथकाने चांदापूरी (ता. माळशिरस) या ठिकाणी सचिन बबन महीमकर, वय 35 वर्षे याच्या ताब्यातून देशी दारू टॅंगो पंच 180 मिली क्षमतेच्या 24 बाटल्या जप्त करण्यात आल्या. एका अन्य कारवाईत दुय्यम निरीक्षक अकलूज राजेंद्र वाकडे यांचे पथकाने विझोरी-अकलूज रोडवर पाळत ठेवून अंकुश रामदास काळे वय 45 वर्ष हा त्याच्या टीव्हीएस दुचाकी क्र. MH 16 AC 4207 वरून प्लास्टिक कॅनमध्ये ८० लिटर हातभट्टीची दारूची वाहतूक करताना आढळून आल्याने त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला.
आवाहन
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही ठिकाणी अवैध हातभट्टी दारु निर्मिती / वाहतूक / विक्री/ साठा, बनावट दारु, परराज्यातील दारु याबाबत माहिती मिळाल्यास या विभागाच्या टोल फ्री क्रमांक 18002339999 व व्हाट्सअप क्रमांक 8422001133 वर संपर्क साधावा, असे आवाहन अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क सोलापूर नितिन धार्मिक यांनी केले आहे.