राजन पाटील यांच्या मंत्रीपदामुळे पाटील घराण्याचे राजकीय वर्चस्व सिध्द होणार का ?

सोलापूर : महाराष्ट्र राज्य सहकारी परिषदचे अध्यक्ष तथा मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांचा रुबाब वाढला आहे. त्याला कारण देखील तसेच आहे. पाटील यांच्याकडील अध्यक्षपदाला राज्यमंत्रीपदाचा देऊन त्या अनुषंगाने, त्यांना सर्व प्रकाराच्या सोई सुविधा देण्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. राज्य शासनाचे उपसचिव अकुंश शिंगाडे यांच्या स्वाक्षरीने परिपत्रक काढण्यात आले आहे.
राजन पाटील यांच्याकडील महाराष्ट्र राज्य सहकार परिषद अध्यक्षपदाला राज्यमंत्रीपदाचा दर्जा देऊन त्या अनुषंगाने, सर्व सोई-सुविधा पुरविण्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या विचाराधीन होते. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० च्या कलम १५४ (अ) (१) मधील तरतुदीचा आधार पाटील यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा देताना सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने घेतला आहे. २७ सप्टेंबर २०२४ पासून पाटील हे या पदावर कार्यरत आहेत. तीन वर्षे किंवा पुढील आदेश येईपर्यंत त्यांना आता राज्य सहकारी परिषदेचे अध्यक्ष म्हणून राज्यमंत्रीपदाचा दर्जा कायम राहणार आहे. राजन पाटील यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
मोहोळ तालुक्यावर कै. लोकनेते बाबुराव पाटील अनगरकर यांच्यापासून पाटील घराण्याचे राजकीय वर्चस्व असून राजन पाटील यांच्या मंत्रीपदाच्या रूपात त्यांना पक्षाने कामाची पोचपावती दिली आहे.
महाराष्ट्र शासन सहकार, पणन व वस्रोद्योग विभागाच्या राज्य सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी माजी आमदार राजन पाटील यांची निवड मागील एक वर्षापूर्वी करण्यात आली होती. त्यांच्या या अध्यक्षपदाला राज्यमंत्रिपदाचा दर्जा होता; परंतु त्या संदर्भातला शासन निर्णय जीआर अद्याप नव्हता. दरम्यान, आता महाराष्ट्र शासन सहकार पणन विभागाच्या माध्यमातून या पदाला राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्यात यावा, असा शासन निर्णय जाहीर करण्यात आल्याने माजी आमदार राजन पाटील यांना राज्यमंत्रिपदाच्या सर्व सुविधा मिळणार आहे. त्यामुळे मोहोळ तालुक्यातील त्यांच्या कार्यकर्त्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष तथा सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, मोहोळचे माजी आमदार ना.राजन पाटील यांच्या अध्यक्षपदाला महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्रोद्योग विभागाकडून राज्यमंत्री पदाचा दर्जा मिळाला असून याबाबतचा आदेश होताच संपूर्ण मोहोळ मतदारसंघामध्ये फटाक्यांची आतषवाजी आणि जल्लोष करत ना.राजन पाटील यांच्या समर्थकांनी
मोठा आनंदोत्सव साजरा केला. सलग तीन टर्म मोठ्या मताधिक्याने विजयी होत स्वतः विधानसभेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ज्येष्ठ नेते राजन पाटील अनगरकर यांनी मोहोळ मतदारसंघ राखीव झाल्यानंतर सलग तीन टर्म पक्षाने दिलेल्या तीन वेगवेगळ्या उमेदवारांना मोहोळ विधानसभेचे आमदार म्हणून विधानसभेत पाठवण्याची किंगमेकर भूमिका बजावली आहे. राष्ट्रवादीच्या जडणघडणीमध्ये कोणत्याही पदाची अपेक्षा न करता खंबीरपणे ना.अजित पवार यांच्या सोबत राहण्याची त्यांनी घेतलेली भूमिका संपूर्ण राज्यात त्यावेळी मोहोळ तालुक्याच्या उर्वरित जलसिंचनासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून हजारो कोटींचा सिंचन निधी आणण्यामध्ये राजन पाटील यांचे मोठे योगदान आहे. अजोड पक्षनिष्ठेची महत्त्वपूर्ण पोचपावती या राज्य मंत्रीपदाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते ना.अजित पवार यांच्याकडून अनगरकर पाटील परिवाराला मिळाल्याची भावना त्यांच्या समर्थकांमधून व्यक्त केली जात आहे. मोहोळ तालुक्याच्या विकासात्मक जडणघडणीमध्ये मोलाचे योगदान असलेल्या राजन पाटील यांच्या मंत्रीपदाच्या रूपाने मोहोळ तालुक्याला कै. शहाजीराव पाटील यांच्यानंतर दुसऱ्यांदा राज्यमंत्रीपद मिळाले आहे. राजन पाटील यांना मंत्रीपद मिळाल्याने मोहोळ तालुक्याच्या विकासाला गती मिळणार असून आगामी काळात ज्येष्ठ नेते राजन पाटील अनगरकर,युवा नेते विक्रांत ऊर्फ बाळराजे पाटील व अजिंक्यराणा पाटील हे सर्व पाटील घराणे मोहोळ तालुक्याचा चौफेर विकास करतील अशी आशा तालुक्यातील सर्वसामान्यांमधून व्यक्त होत आहे.