यात्रा कालावधीमध्ये अन्न सुरक्षेच्या दृष्टीने दक्षता घ्यावी
सोलापूर दि.09:- सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिध्देश्वर यात्रा 12 जानेवारी पासुन सुरू होत आहे. तरी सदर यात्रा कालावधीमध्ये अन्न व औषध प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करुन अन्न सुरक्षेच्या दृष्टीने ग्राहकांना स्वच्छ, निर्भेळ, ताजे अन्न पदार्थांची विक्री करण्यात यावी.
यात्रा कालावधीत अन्न पदार्थ व इतर खाद्यपदार्थ खरेदी करताना परवानाधारक / नोंदणीधारक आस्थापना कडूनच खरेदी करावेत, अन्न पदार्थ हे स्वच्छ, निर्भेळ, आरोग्यदायी असावेत असेच अन्नपदार्थ उपलब्ध करून देण्यात यावेत, तयार अन्नपदार्थ हे नेहमी झाकून ठेवलेले असावेत जेणेकरून त्यावर धूळ, कीटक, माशा बसणार नाहीत व अन्न पदार्थ दुषित होणार नाही याची काळजी घ्यावी.अन्न पदार्थ बनवताना स्वच्छ वातावरणात व स्वच्छ जागेमध्ये तयार करावेत. पॅकबंद असलेलेच अन्नपदार्थ पदार्थ विकत घ्यावेत. सदर पॅकेटवर उत्पादकाचा तपशील, उत्पादन दिनांक, बेस्ट बिफोर, मुदतबाह्य दिनांक, बॅच नंबर इत्यादी तपासून खरेदी करावेत. अन्न पदार्थ बनविण्यासाठी पिण्यायोग्य पाण्याचाच वापर करावा.उघड्यावरील व माशा, कीटक, धूळ बसलेले अन्न पदार्थाचे सेवन करण्यात येऊ नये. हॉटेल, रेस्टॉरंट, नाश्ता सेंटर येथे अन्न पदार्थ बनविण्यासाठी चांगल्या प्रतीचेच खाद्यतेलाचा वापर करावा. खाद्यतेल हे 2-3 वेळाचा अन्नपदार्थ तळण्यासाठी वापरावे. शिळे, बुरशी आलेले, विटलेले अन्न पदार्थाचे वितरण करू नये वा सेवन करू नये. अन्न पदार्थाची योग्य विल्हेवाट लावावी.
दुध व दुग्धजन्य अन्नपदार्थ हे ताजे व योग्य तापमानात साठवणूक केलेले आहेत याची खात्री करूनच खरेदी करावी. (दुध, बासुंदी,रबडी, श्रीखंड, दही इत्यादी)दुध व दुग्धजन्य अन्नपदार्थ हे ताजे व योग्य तापमानात साठवणूक केलेले योग्य कालावधी मध्येच सेवन करावे.अन्न विषबाधा होणार नाही याची खबरदारी घ्यावी.बर्फ युक्त पेये पिण्याचे टाळावे.सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करु नये, तंबाखु/गुटखा/पानमसाला इत्यादीचे सेवन करुन सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये.
तसेच या कार्यालयामार्फत जानेवारी ते डिसेंबर 2024 या कालावधीमध्ये प्रतिबंधित अन्न पदार्थाच्या अनुषंगाने 08 ठिकाणी धाडी टाकून 10 लाख 46 हजार 828 रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आलेला आहे. सदर प्रकरणी संबंधित विक्रेत्यांविरुध्द शहरातील विविध पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल करण्यात आलेले आहे. तसेच यापुढे देखील कार्यालयामार्फत वेळोवेळी गोपनिय पध्दतीने माहिती काढून प्रतिबंधित अन्न पदार्थाच्या अनुषंगाने कडक कारवाई घेण्यात येईल अशी माहिती अन्न औषध प्रशासनचे सहायक आयुक्त सा.ए.देसाई यांनी दिली आहे.