सोलापूर
माजी विरोधी पक्षनेते आप्पासाहेब चौगुले यांनी दिला धर्मराज काडादी यांना पाठिंबा
हद्दवाढ भागातून मताधिक्य देण्याचा निर्धार

सोलापूर, – महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते आप्पासाहेब चौगुले यांनी आमदार सुभाष देशमुख यांच्या कार्यपध्दतीला कंटाळून शनिवारी भाजप पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर रविवारी त्यांनी सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा देत हद्दवाढ भागातून मोठे मताधिक्य देण्याचा निर्धार व्यक्त केला.
दक्षिण विधानसभा मतदारसंघातून आमदार सुभाष देशमुख यांना भाजपने उमेदवारी देऊ नये, अशी मागणी भाजपच्याच माजी नगरसेवकांनी केली होती. त्यानंतर शनिवारी भाजपचे महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते आप्पासाहेब चौगुले यांनी भाजपमध्ये जुन्या निष्ठावंत अभ्यासू कार्यकर्त्यांची कदर नाही. त्यांना स्थान नाही. विचारात घेतले जात नाही, असे सांगत आमदार सुभाष देशमुख यांच्या कार्यपध्दतीला कंटाळून अखेर भाजप पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.
गेल्या दहा वर्षांपासून भाजपमध्ये गटबाजी वाढली आहे. शिस्त राहिली नाही. पक्षापेक्षा नेत्यांना स्वतःचे राजकारण आणि गटबाजी महत्त्वाची वाटते. अशा परिस्थितीत काम करणे अवघड आहे. आमदार देशमुख यांच्या कार्यपध्दतीला मी कंटाळलो. त्यांनी पक्षात स्वतःचा एक पक्ष स्थापन केला असल्याची स्थिती आहे. आमदार देशमुख हे पक्षाचे नव्हे तर लोकमंगलचे नेते आहेत, असेच वाटते. माझ्यासारख्या अनेक जुन्या कार्यकर्त्यांचा विचार केला जात नाही, असा आरोप चौगुले यांनी केला. हद्दवाढ भागाच्या विकासासाठी या निवडणुकीत आपण अपक्ष उमेदवार आणि सिध्देश्वर परिवाराचे प्रमुख धर्मराज काडादी यांच्या पाठीशी राहणार असून त्यांना मोठे मताधिक्य या भागातून मिळवून देण्याचा आपला प्रयत्न राहील, असे त्यांनी सांगितले.
यावेळी प्रा. डॉ. संतोष मेटकरी, होनमुर्गीचे माजी सरपंच अमोगसिध्द वाघमारे, अण्णाराव कांबळे, भीमाशंकर सनगुंदी आदी उपस्थित होते.
.
चौगुले यांच्या निर्णयाचे स्वागत
आप्पासाहेब चौगुले हे हाडाचे कार्यकर्ते आहेत. महापालिकेत काम करताना त्यांनी हद्दवाढ भागाचे अनेक प्रश्न मांडून ते सोडवले होते. भाजपच्या लोकप्रतिनिधींच्या एकाधिकारशाहीला कंटाळून त्यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या या स्वाभिमानी निर्णयाचे आपण स्वागत करतो. या पुढील काळात त्यांच्यासोबत राहून त्यांना मदत करण्याची आपली भूमिका राहील. आणखी दोन दिवसांत भाजपमधील काहीजण आपल्यासोबत दिसतील.
धर्मराज काडादी
अपक्ष उमेदवार सोलापूर दक्षिण मतदारसंघ
राजकारणात चांगल्या माणसांची गरज
भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर रविवारी सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा केली. स्वाभिमान घाण न ठेवता सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असलेले उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. राजकारणांमध्ये चांगल्या माणसाची गरज आहे. अनेकजण संस्था काढतात आणि त्यावर मोठे होतात. मात्र, काडादी यांच्या पूर्वीपासून संस्था आहेत. या संस्थांच्या माध्यमातून त्यांनी मोठे काम उभारले आहे. संस्था असूनही ते राजकारणापासून अलिप्त होते. मात्र त्यांनी ‘दक्षिण’मधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा दिला.
अप्पासाहेब चौगुले
माजी विरोधी पक्षनेते