March 12, 2026

ShivNirnay

हिंदवी बाण्याचे मराठी दैनिक

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवा

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवा
उमरगा : महाराष्ट्र राज्यातील मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यासाठी विधीमंडळाचे विशेष अधिवेशन घेण्याची मागणी आ. ज्ञानराज चौगुले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दि.३१ रोजी पत्राद्वारे केली आहे.
याबाबत दिलेल्या पत्रात आ.चौगुले यांनी म्हणले आहे कि, मागील अनेक वर्षापासून राज्यातील मराठा समाजबांधव हे आरक्षणाची मागणी करत असुन सध्या मराठा समाज आपल्या शासनाकडे आरक्षणाच्या बाबतीमध्ये एका आशेचा किरण म्हणून पाहत आहे. आपण स्वतः या विषयाकडे जातीने लक्ष ठेवून आहात आणि मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत आपली सकारात्मक भूमिका सुरुवातीपासूनच आहे. सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे मागील ६ दिवसांपासुन दुसऱ्यांदा आमरण उपोषणास बसले असुन त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. त्यांना पाठींबा म्हणुन मराठा समाजाच्या वतीने प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी व गावागावात आमरण उपोषण व साखळी उपोषण करण्यात येत आहे. तसेच याबाबत लवकरच निर्णय न झाल्यास माझ्या मतदारसंघातील कवठा येथील  शेतकरी नेते विनायकराव पाटील यांनी दि.०३ नोव्हेंबर रोजी जिवंत समाधी घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या सर्व घटनाक्रमामुळे समाजबांधवांच्या भावना तीव्र होत चालल्या आहेत. सकल मराठा समाजाला तात्काळ सर्व स्तरावर टिकेल असे आरक्षण देण्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलविण्यात यावे अशी मागणी आ.चौगुले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.