राजकारण

भाजपा मराठी माणसाच्या विरोधात : सुळे

शिव निर्णय / इंदापूर :

भाजप हा मराठी माणसांच्या विरोधात आहे. त्यांनी आधी शिवसेना फोडली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस फोडली. या पक्षांमध्ये वाद निर्माण केले. नितीन गडकरींना त्रास दिला. दोनशे आमदार असून ऊस, कांदा साखरेला दर मिळत नाही. दुधाचा दर कमी होतो. सामान्यांचे, शेतकऱ्यांचे सरकार सत्तेत नाही. सत्तेत असलेल्यांचा विकास झाला, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. इंदापूर येथील शहा सांस्कृतिक भवनात इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस

(शरद पवार गट) कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी खासदार सुप्रिया सुळे होत्या. मेळाव्यातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. या वेळी पुणे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा भारती शेवाळे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने, माजी कार्याध्यक्ष अमोल भिसे, छाया पडळसकर, तालुकाध्यक्ष तेजसिंह पाटील, कार्याध्यक्ष महारुद्र पाटील, सागर मिसाळ, आझाद मुलाणी आदी मान्यवर उपस्थित होते.

सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम असा प्रभू श्रीरामांचा उल्लेख करणाऱ्या माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालची भाजप ही खरी भाजप होती. वाजपेयी यांनी राजकारणासाठी कधीही ईडी, सीबीआयचा वापर केला नव्हता. आता सर्व मर्यादांचे उल्लंघन करणारी भाजप केंद्र व राज्यात सत्तेवर विराजमान आहे. दादा थोरात यांनी प्रास्ताविक केले. दरम्यान, यावेळी हँडबॉल स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणाऱ्या खेळाडूंचा सन्मान करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button