डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे येथे 26 व्या दीक्षांत समारंभाचे आयोजन
रायगड :- डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे चा 26 वा दीक्षांत समारंभ शुक्रवार दि. 16 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11.30 वा. विद्यापीठाच्या प्रेक्षागृहात आयोजित केला आहे. या दीक्षांत समारंभाकरिता महाराष्ट्र राज्याचे महामहीम राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती मा.सी.पी. राधाकृष्णन या दीक्षांत समारंभाचे अध्यक्षस्थान भूषवतील. तसेच या 26 व्या दीक्षांत समारंभाकरिता प्रमुख अतिथी म्हणून पद्मविभूषण डॉ.अनिल काकोडकर, अध्यक्ष राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग, उच्च तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत दादा पाटील, उद्योगमंत्री तथा पालकमंत्री रायगड जिल्हा उदय सामंत, महिला व बाल विकास मंत्री कुमारी आदिती तटकरे हे मान्यवर उपस्थित राहणार असून ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. या कार्यक्रमाचे प्रत्यक्ष व दूरदृष्यप्रणाली मार्फत थेट प्रक्षेपण करण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलगुरू कर्नल प्राध्यापक डॉ. कारभारी काळे यांनी दिली आहे.
याकरिता https://youtube.com/live/xSe3cuoo26U या लिंकचा वापर करुन सहभागी व्हावे
या कार्यक्रमा दरम्यान विद्यापीठाचे मा. कुलगुरू कर्नल प्राध्यापक डॉ. कारभारी काळे हे विद्यापीठाचा सन 2023-24 चा वार्षिक अहवाल सादर करतील. विद्यापीठाचे कार्यकारी परिषद सदस्य, विद्या परिषदेचे सदस्य, अधिष्ठाता, कुलसचिव,परीक्षा नियंत्रक,मान्यवर तसेच सर्व अध्यापक वर्ग प्रशासकीय वर्ग व आजी-माजी विद्यार्थीही उपस्थित राहणार आहेत.
२६ व्या पदवीदान समारंभाकरिता पदविका, प्रगत पदविका, पदवी आणि विद्यावाचस्पती प्रमाणपत्र स्वीकारण्यासाठी विद्यार्थ्यांना विद्यापीठात उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.