जिल्ह्यातील सूक्ष्म व लघुउद्योजकांना शासकीय योजनांचा लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी किशन जावळे

रायगड :- सूक्ष्म व लघुउद्योजकांकरिता शासनाच्या विविध योजना असून या योजनांचा लाभ जिल्ह्यातील सूक्ष्म व लघुउद्योजकांनी घ्यावा,असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आज येथे दिले. महसूल पंधरवडानिमित्त जिल्हा उद्योग केंद्र येथे मत्स्यप्रक्रियेवर आधारित (सोलर ड्रायर) व कोकण बांबू कला केंद्र कल्स्टर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यशाळेकरिता उद्योग केंद्राचे महाव्यवस्थाक जी.एस.हरळया, बांबू कल्स्टरचे संचालक श्री.जामकर, एमसीईडीचे प्रकल्प संचालक आनंद विद्यागर उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी श्री.जावळे म्हणाले की, जिल्ह्यातील सूक्ष्म व लघु उद्योजकांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करण्याकरिता जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल. तसेच पुढील शासकीय कार्यक्रमात येथील बांबू उत्पादकांनी तयार केलेल्या हत्याराची भेटवस्तू म्हणून देण्यात येईल. मत्स्यप्रक्रिया उद्योजकांना जिल्ह्यात प्रचंड प्रमाणात क्षमता असून या उद्योजकांना सोलार ड्रायरसारख्या यंत्रसामुग्रीची जोड शासकीय योजनांद्वारे देण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी श्री.जावळे यांनी उद्योजकांनी उभारलेल्या स्टॉल भेट देवून माहिती घेतली.
जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जी.एस.हरळया यांनी आपल्या प्रास्ताविकात बांबू कल्स्टर मत्स्यप्रक्रिया उद्योगाचे प्रात्यक्षिक व सोलार ड्रायरच्या वापराबाबत मार्गदर्शन केले. या कार्यशाळेकरिता महिला तसेच नव उद्योजक उपस्थित होते.